नैसर्गिक गॅसच्या किमती बदलण्याची भारताची मागणी

नैसर्गिक गॅसच्या किमती बदलण्याची भारताची मागणी

तापी पाईपलाईन

भारताने १० अब्ज डॉलरच्या प्रस्तावित तुर्कमेनिस्तान – अफगाणिस्तान – पाकिस्तान आणि भारत अर्थात तापी पाईपलाईनद्वारे पुरवण्यात येणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या मूल्यामध्ये फेरबदल अथवा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. जागतिक ऊर्जा बाजारात दरात घट झाल्यामुळं ही मागणी करण्यात आल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

चार देशांमध्ये झाला करार

या पाईपलाईन प्रकल्पासाठी चार देश अर्थात तुर्कमेनिस्तान – अफगाणिस्तान – पाकिस्तान आणि भारत (तापी)नं २०१३ मध्ये गॅस विक्री आणि खरेदी करार (जीएसपीए) वर स्वाक्षरी केली होती. या करारान्वये तुर्कमेनिस्तानला सध्या अस्तित्वात असणारं कच्च तेल हे किमतीच्या ५५ टक्क्यांवर नैसर्गिक गॅसची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळं तुर्कमेनिस्तानच्या सीमेवर गॅसची किंमत ही साधारण ७.५ डॉलर प्रति दहा लाख ब्रिटीश थर्मल युनिट (एमएमबीटीयू) इतकी आहे.

ग्राहकांना मिळणार १३ डॉलरमध्ये गॅस

सूत्रांच्या सांगण्यानुसार, परिवहन शुल्क लागल्यानंतर भारतीय सीमेवर याची किंमत वाढून १०.५ डॉलर प्रति एमएमबीटीयू इतकी होते. स्थानिक आणि परिवहन शुल्क जोडल्यानंतर याची किंमत ग्राहकांना साधारण १३ डॉलर प्रति एमएमबीटीयू इतकी असेल. तसंच ‘जागतिक ऊर्जा बाजारात सध्याची स्थिती पाहता ही किंमत योग्य नाही आणि त्यामुळंच भारतानं सध्याच्या गॅस बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन जीएसपीएवर पुन्हा चर्चा करण्याचा पर्याय ठेवला आहे,’ असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

भारतात किंमत दुप्पट

तुर्कमेनिस्तान गॅसची किंमत हे भारतातील नैसर्गिक गॅस उत्पादकांना मिळणाऱ्या ३.६ डॉलर प्रति एमएमबीटीयूच्या दुप्पट आहे. चारही देशांच्या नेत्यांनी डिसेंबर २०१५ मध्ये या प्रकल्पावर काम सुरु केलं. मात्र, त्यावर अतिशय धीम्या गतीनं काम चालू आहे. या प्रकल्पावर आर्थिक व्यवहार, पूर्ततेची सुरक्षा आणि कर्ज वा इक्विटी करार असे मुद्दे अजूनही सोडवण्यात आलेले नसून हा प्रकल्प पुढे जात नाही.

First Published on: August 22, 2018 5:39 PM
Exit mobile version