नोबेल मिळवणाऱ्या बॅनर्जीनींही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केली चिंता

नोबेल मिळवणाऱ्या बॅनर्जीनींही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत व्यक्त केली चिंता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती प्रभाकर यांनी आज द हिंदूमध्ये लेख लिहून अर्थव्यवस्थेबाबत भाजपला खडे बोल सुनावले. त्यानंतर आजच इंडो-अमेरिकन वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाल्याची बातमी आली. अर्थशास्त्रात नोबेल मिळवणाऱ्या बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत असल्याचे बॅनर्जी म्हणाले आहेत. तसेच सध्या जी आकडेवारी आहे त्यावरुन तरी नजीकच्या काळात अर्थव्यवस्था सुधारेल अशी चिन्ह नसल्याचेही बॅनर्जी म्हणाले आहेत.

५८ वर्ष वय असलेल्या अभिजीत बॅनर्जी यांना इस्थर डफलो आणि मायकेल क्रेमर यांच्यासमवेत अर्थक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जागतिक गरिबी या विषयावर संशोधन केल्यामुळे बॅनर्जी यांना नोबेल प्रदान करण्यात आला आहे. इतक्या कमी वेळात हा पुरस्कार मला मिळेल, अशी अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी दिली.

अमेरिकेतील एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपली मते व्यक्त केली. मागच्या पाच वर्षाच्या काळात अर्थव्यवस्था धीम्यगतीने का होईना पण प्रगतीपथावर होती. मात्र वर्तमान परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत झाली असल्याचे ते म्हणाले.

First Published on: October 14, 2019 8:45 PM
Exit mobile version