वॉलमार्टच्या फ्लिपकार्ट खरेदीच्या विरोधात लहान व्यापाऱ्यांचं आंदोलन

वॉलमार्टच्या फ्लिपकार्ट खरेदीच्या विरोधात लहान व्यापाऱ्यांचं आंदोलन

वॉलमार्ट

आंतरराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टनं भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या प्रस्तावित संपादन करण्याविरोधात दिल्लीतील व्यापारांनी आंदोलन केलं आहे. अखिल भारतीय व्यापारी संघ (सीएआयटी) अन्वये विरोध करत असलेल्या व्यापाऱ्यांनी हा सौदा योग्य नसल्याचं सांगत बाजारात यामुळं चुकीची स्पर्धा होईल असं म्हणणं मांडलं. या प्रकरणात सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर, ई-कॉमर्स नियंत्रित करणारी संस्था स्थापन करावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

व्यापाऱ्यांचं म्हणणं नक्की काय?

वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या या व्यवहारामुळं चुकीची स्पर्धा निर्माण होऊन बाजारात असमानता, हिंसक मूल्य निर्धारण आणि जास्त सूट तसंच वित्तीय नुकसान होण्याची शक्यता असल्याचं सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं. शिवाय संपूर्ण देशभर असंच याविरोधातील आंदोलन सुरु राहणार असून यामध्ये १० लाख ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यापाऱ्यांनी सहभागी झाल्याचंही सांगितलं. सीएआयटीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, २३ ते २५ जुलैला होणाऱ्या राष्ट्रीय संमेलनात पुढे काय पाऊल उचलणार? याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

वॉलमार्टचं उत्तर

याबाबत वॉलमार्टनं मात्र आपलं म्हणणं मांडताना व्यापाऱ्यांवर अशा प्रकारे परिणाम होईल याचा स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. बी-२बी व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही केवळ लहान व्यापाऱ्यांना यशस्वी नाही करत तर, त्यांना आधुनिक बनवण्यासाठीदेखील मदत करत आहोत असं स्टेटमेंटद्वारे वॉलमार्टनं सांगितलं आहे. फ्लिपकार्टसह आमची भागीदारी हजारो स्थानिक पुरवठादार आणि उत्पादकांना बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची सुविधा उपलब्ध करून देईल, तर शेतकऱ्यांना बाजारपेठेत प्रवेश मिळवून देईल आणि भारतातील स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन देईल असंही त्यांनी या स्टेटमेंटमध्ये नमूद केलं आहे. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टच्या या व्यवहारामुळं भारतामध्ये एक अग्रगण्य ई-कॉमर्स तयार होण्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सर्वात मोठा व्यवहार

अमेरिकेच्या वॉलमार्टनं मागच्या महिन्यातच भारतीय फ्लिपकार्टमध्ये मोठा भाग खरेदी केला आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये १६ अब्ज डॉलर (१ लाख कोटी रुपयेपेक्षा अधिक) इतका मोठा व्यवहार करण्यात आला आहे. वॉलमार्टनं भारतीय कंपनीत ७७ टक्के हिस्सा खरेदी केला असून जपानी ग्रुप सॉफ्टबँकच्या सीईओनं या व्यवहारासंदर्भात माहिती दिली आहे.

First Published on: July 2, 2018 8:52 PM
Exit mobile version