भारतातील मलेरियाचा धोका झाला कमी – डब्ल्यूएचओचा अहवाल

भारतातील मलेरियाचा धोका झाला कमी – डब्ल्यूएचओचा अहवाल

(फोटो प्रातिनिधिक आहे)

मलेरियाचा धोका कमी करण्यात भारताला यश आले आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मलेरियाच्या प्रकरणांमध्ये १७.६ टक्क्यांनी घट झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल (डब्ल्यूएमआर) २०२० मधून समोर आले आहे. जगात कोरोनाने थैमान घातले असताना डब्ल्यूएचओचा अहवाल भारतासाठी दिलासादायक ठरला आहे.

गणिती मांडणीवर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणार्‍या मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल २०२० हा डब्ल्यूएचओने प्रसिद्ध केला. त्यानुसार भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. भारतामध्ये मलेरियाची रुग्णसंख्या २० लाखांवरून ६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. २००० ते २०१९ पर्यंत मलेरियाच्या रुग्णसंख्येचा टक्का ७१.८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. मलेरियाने होणार्‍या मृत्यूंचे प्रमाणही ७३.९ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. भारतामध्ये २००० मध्ये मलेरियाचे २० लाख ३१ हजार ७९० रुग्ण होत. तर ९३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१९ मध्ये हे प्रमाण ३ लाख ३८ हजार ४९४ रुग्णांवर आले असून, ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१८ ला ४ लाख २९ हजार ९२८ रुग्ण तर ९६ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये ३ लाख ३८ हजार ४९४ रुग्ण, तर ७७ जणांचा मृत्यू झाला होता. यातून दोन्ही वर्षामध्ये रुग्ण व मृत्यूच्या प्रमाणामध्ये अनुक्रमे २१.२७ टक्के आणि २० टक्के घट झाल्याचे दिसून येते. २०२० मध्ये मलेरिया रुग्णसंख्या ऑक्टोबरपर्यंत १ लाख ५७ हजार २८४ आहे. मलेरिया रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेला भारत एकमेव देश आहे. तसेच मिलेनियम विकास उद्दिष्टांमधील सहावे उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले आहे.

वार्षिक परजीवी घटनांमध्येसुद्धा २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये २७.६ टक्के घट आणि २०१८ पेक्षा २०१९ मध्ये १८.४ टक्के घट झालेली आहे. हा आकडा २०१२ पासून सातत्याने कमी राखण्यात भारताला यश आले आहे. मलेरियाच्या उच्चाटनाचे प्रयत्न देशात २०१५ पासून सुरू झाले आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने २०१६ मध्ये मलेरिया उच्चाटनासाठी राष्ट्रीय नियमावली प्रत्यक्षात आणल्यानंतर त्यांना वेग आला. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जुलै २०१७ मध्ये मलेरिया उच्चाटनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (२०१७-२२) प्रसिद्ध केली. त्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या धोरणाची मांडणी केली आहे.

मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य

मलेरियाचे प्रमाण ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लक्षणीय आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश मणीपूर, मिझोराम, नागालँड, ओदिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, चंदीगढ़, दमण आणि दीव, दादरा नगरहवेली व लक्षद्वीप या राज्यांमध्ये लक्षणीय संख्या आहे. मलेरिया साथरोगाचे वाढते प्रमाण असणार्‍या राज्यांमध्ये मलेरियाचे प्रमाण कमी होताना आढळते आहे.

केंद्र सरकारकडून केलेल्या उपाययोजना

सुक्ष्मदर्शकांचा पुरवठा, जलद निदान, टिकावू किटक प्रतिरोधक जाळ्या असे भारत सरकारतर्फे प्रयत्न करण्यात आले. इशान्य भारतातील सात राज्ये, छत्तीसगढ़ झारखंड, मध्यप्रदेश आणि ओदिशा या मलेरिया साथरोगाचा भर असणार्‍या राज्यांमध्ये २०१८-१९ पर्यंत ५ कोटी किटक प्रतिरोधक जाळ्या तर आताच्या आर्थिक वर्षात अजून २.२५ कोटी किटक प्रतिरोधक जाळ्यांचा पुरवठा केल्यामुळे मलेरियाचा प्रसार कमी होण्यास बर्‍याच अंशी मदत झाली. जनतेने मोठया प्रमाणावर या जाळ्यांचा वापर स्वीकारला आणि देशातील मलेरियाच्या संसर्गाला आळा बसण्यास मदत झाली.

First Published on: December 2, 2020 5:59 PM
Exit mobile version