चांद्रयान-२ मोहिमेचा मुहूर्त ठरला; दूरदर्शनवरून थेट प्रसारण

चांद्रयान-२ मोहिमेचा मुहूर्त ठरला; दूरदर्शनवरून थेट प्रसारण

चांद्रयान-२ मोहीम

भारताचा बहुप्रतिक्षीत चांद्रयान-२ अवकाशात झेप घेण्यास सज्ज झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी मोहिमेच्या प्रक्षेपणाविषयी आज माहिती दिली. त्यानुसार सोमवारी १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी GSLV MK-III या यानाचा वापर करण्यात येणार आहे. या यानाने यशस्वीरित्या उड्डाण केल्यानंतर चंद्रावर उतरण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली.

चांद्रयानाने चंद्रावर बर्फाचा शोध लावण्यात चांद्रयान यशस्वी ठरले तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती वसण्याची शक्यता आहे. प्रक्षेपणानंतर ५३ ते ५४ दिवसांत ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पोहोचल्यास भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातील एकही देश पोहोचू शकलेला नाही. त्यामुळेच भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेकडे भारतीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची भौगोलिक स्थिती

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे सूर्याची किरणं तिरपी पडतात. त्यामुळे तेथे बहुतांशवेळेस अंधारच असतो. तसेच तेथील तापमान खूपच कमी असते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्याची किरणं सरळ नाही तर तिरकी पडतात. त्यामुळे येथील तापमान खूपच कमी असते. या भागात मोठमोठे खड्डे मोठ्या प्रमाणात आढळतात. या खड्ड्यांचे तापमानही -२५० डिग्री सेल्सिअसच्या जवळपास पोहोचते. एवढ्या थंड तापमानात लँडर आणि रोवरला चालवणे मोठे आव्हान ठरू शकते. या क्रेटर्समध्ये जीवाश्मांव्यतिरिक्त पाणी देखील बर्फाच्या रुपात अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते.

दूरदर्शन, संकेतस्थळ, समाजमाध्यमांवरून पाहता येणार प्रक्षेपण

१५ जुलै २०१९ रोजी चांद्रयान-२चे यशस्वी उड्डाण होणार आहे. या उड्डाणाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन, तसेच इस्रोचे संकेतस्थळ आणि यू-ट्यूब, फेसबुक व ट्विटरवरून पाहता येणार आहे.

First Published on: July 13, 2019 3:00 PM
Exit mobile version