म्हणुन जमावाने ३०० मगरींना संपवलं

म्हणुन जमावाने ३०० मगरींना संपवलं

इंडोनेशियन लोकांनी संपवलेल्या मगरींचे छायाचित्र

इंडोनेशियात संतप्त जमावाकडुन तब्बल ३०० मगरींना मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुडाच्या भावनेतून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. इंडोनेशियात पापुआ प्रांतात एक व्यक्ती जनावारांना चारा आणण्यासाठी गेला होता. पण मगरीने केलेल्या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुगीतो असे असुन तो ४८ वर्षांचा होता. त्याचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतप्त जमावाने तब्बल ३०० मगरींना संपवले आहे. या मगरींमध्ये ४० इंचाच्या पिल्लांपासुन मोठ्या मगरींचाही समावेश आहे.

ज्या शेतात हि घटना घडली त्या शेतात शेकडो मगरींचे वास्तव्य होते. घटना घडल्यानंतर कुटुंबियाने पोलिसांत तक्रार केली होती. त्या शेतमालकाने याची जबाबदारी घेत मृत व्यक्तीच्या कुटूंबियांना भरपाई देण्याचे कबुलही केले होते, पण तरीही संतप्त जमावाने एवढ्यावरच समाधान न मानता शस्त्रांसह या शेतात घुसून मगरींना संपवले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी तो जमाव मगरींना संपविण्यासाठी आला होता त्यावेळी जमावाची संख्या मोठी होती त्यामुळे त्यांना आम्ही थांबवू शकलो नाही. पण ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

First Published on: July 17, 2018 12:18 PM
Exit mobile version