रुग्णवाहिका चालकाने घेतला मोठा लंच ब्रेक; बाळाचा गाडीतच मृत्यू झाला

रुग्णवाहिका चालकाने घेतला मोठा लंच ब्रेक; बाळाचा गाडीतच मृत्यू झाला

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना महामारीच्या काळात आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. प्रत्येक राज्यातून भोंगळ आरोग्य व्यवस्थेची उदाहरणे रोज पाहायला मिळतात. नुकतेच ओडिशामध्ये एक दुर्दैवी आणि दुःखद प्रकार घडला आहे. रुग्णवाहिकेतून एक वर्षाच्या बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका चालकाने रस्त्यात मोठा लंच ब्रेक घेतला. त्यामुळे आई-वडिलांच्या हातातच त्यांच्या तान्ह्या मुलाचा जीव गेला. रुग्णवाहिकेचे चालक ढाब्यावर जास्त वेळ टाईमपास करत बसल्यामुळे ही वाईट घटना घडली.

ओडिशाचा आदिवासी बहुल असलेला जिल्हा मयुरभंज येथे ही घटना घडली. निरंजन बेहेरा आणि गीताबेहेरा यांचा एका वर्षाच्या मुलाला पीआरएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रविवारी उपचारासाठी दाखल केले होते. मुलाला डायरिया सदृश्य आजार झाला होता. सोमवारी मुलाची तब्येत गंभीर झाल्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जावे, असे पालकांना सांगितले.

डॉक्टरांच्या सूनचेनंतर बेहेरा दाम्पत्यांनी १०८ रुग्णाहिकेतून प्रवास सुरु केला. पीआरएम रुग्णालयातून रुग्णवाहिका निघाल्यानंतर रस्त्यात चालक आणि त्याचा फार्मासिस्ट सहकाऱ्याने ढाब्यावर जेवणाचा निर्णय घेतला. आम्ही लगेच जेवून येतो, असे दाम्पत्याला सांगून दोघेही जेवायला गेले.

मात्र एक तास होऊनही दोघेही न परतल्याने ब्रिंजन बेहेरा ढाब्यावर जाऊन त्यांना लवकर चला असे सांगितले. यानंतर चालक आणि फार्मासिस्टने उलट बेहेरा यांनाच सुनावत आम्हाला गांभीर्य कळते असे सांगितले. तब्बल ९० मिनिटांनी चालक परतला. मात्र तोपर्यंत मुलाची तब्येत बिघडली होती. ढाब्यावरुन अवघ्या १० किमी अंतरावर गेल्यानंतर वाटेतच असलेल्या क्रिष्णाचंद्रपूर कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे मुलाला दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुलाच्या मृत्यूमुळे दाम्पत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर क्रिष्णाचंद्रपूर येथे चालक आणि फार्मासिस्टच्या विरोधात तक्रार दाखल केली. चालक आणि फार्मासिस्ट यांनी मोठा ब्रेक घेतला नसता तर आमचा मुलगा वाचला असता अशी प्रतिक्रिया ब्रिजंन बेहेरा यांनी दिली.

First Published on: August 11, 2020 2:33 PM
Exit mobile version