सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन; बॉडी स्प्रेची जाहिरात मागे घेण्याचे आदेश

सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन; बॉडी स्प्रेची जाहिरात मागे घेण्याचे आदेश

बॉडी स्प्रेच्या (Body Spray) एका खासगी कंपनीने केलेली जाहिरात (Advertisement) चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या जाहिरातीवरून बलात्काराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आक्षेप करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Information and Broadcasting Ministry) ही वादग्रस्त जाहिरात सर्व माध्यमांवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकरता कंपन्यांकडून आकर्षक पद्धतीने जाहिरात केली जाते. या जाहिरांतीवर कोट्यवधी रुपयेही खर्च केले जातात. मात्र, जाहिरात आकर्षक करण्याच्या नादात अनेकदा कंपनी वादग्रस्त जाहिरात तयार करते, त्यामुळे समाजात चुकीचे समज पसरू शकतात. अशीच एक जाहिरात एका बॉडी स्प्रे (Body Spray) कंपनीने केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून महिलांवरील सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या जाहिरातीविरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रियाही आल्या असून या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही जाहिरात सर्व माध्यमांवरून हटवण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशीही करण्यात येणार आहे.

ही जाहिरात प्रसिद्ध होताच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत स्प्रे कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. “या जाहिरातीच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय? बॉडी स्प्रेच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावणार आहे. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनादेखील पत्र पाठवून या जाहिरातीचे प्रक्षेपण थाबंवण्याची विनंती करणार आहे,” असे स्वाती मालिवाल म्हणाल्या होत्या.

First Published on: June 4, 2022 7:12 PM
Exit mobile version