गॅस सिलेंडर बुकींग करताच ३० ते ४० मिनिटात येईल घरी

गॅस सिलेंडर बुकींग करताच ३० ते ४० मिनिटात येईल घरी

गृहिणींची घरगुती गॅस सिलेंडर बुकींगची चिंता आता मिटणार आहे. कारण बुकिंगनंतर अवघ्या ३०-४० मिनिटांमध्ये सिलेंडर आता घर पोहच मिळणार आहे. याआधी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगनंतर जवळपास तीन ते चार दिवस वाट पाहावी लागत होती. मात्र आता सरकारी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑयल (IOC) ने एलपीजी तत्काळ सेवा (Tatkal LPG Seva) सुरू केल्याने ३० मिनिटात सिलेंडर तुमच्या घरी येणार आहे.  इंडियन ऑयल ही कंपनी आयओसी इंडेन या नावाने गॅस सिलेंडर सेवा देत आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शहरांमध्ये ही सेवा सुरु होणार असून ग्राहकांना अर्धा तासामध्ये सिलेंडर मिळू शकणार आहे. एकच सिलेंडर असणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर संपल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा ग्राहकांना या सेवाचा फायदा होणार आहे.

देशभरात सध्या २८ कोटी एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करणारे ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल १४ कोटी ग्राहक हे इन्डेनचे आहेत. त्यामुळे इंडेनच्या १४ कोटी ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. यासंदर्भात आयओसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्काळ एलपीजी सेवा किंवा सिंगल डे डिलिव्हरी सेवेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना काही अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क किती असावे याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तसेच १ फेब्रुवारीपर्यंत ही सेवा सुरु होण्याची शक्यता असून लवकरच ग्राहकांना याबाबतची माहिती दिली जाईल असे सांगितले. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, प्रत्येक राज्यातील एका शहराची किंवा जिल्ह्याची निवड करत आयओसी ही सेवा सुरु करणार आहे. या सेवेच्या माध्यमातून कंपनी प्रत्येक ग्राहकाला ३० ते ४० मिनिटात गॅस सिलेंडर डिलिव्हर करणार आहे. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल या योजनेसाठी काम करत असुन हे काम लवकरचं अंतिम टप्प्यात येईल.

 

First Published on: January 13, 2021 9:18 PM
Exit mobile version