चंद्रयान २ – NASAच्या LRO ची धडक टळली, ISRO चा यशस्वी प्रयत्न

चंद्रयान २ – NASAच्या LRO ची धडक टळली, ISRO चा यशस्वी प्रयत्न

गेल्या महिन्यातील एका मोठ्या घटनेचा खुलासा आता झाला आहे. गेल्या महिन्यात एक अशी घटना घडताना रोखली गेली आहे ज्यामुळे चंद्रयान २ आणि नासाच्या लूनर रिकोनिसेंस ऑर्बिटरची धडक झाली असती. अतिशय समोरासमोर आल्यानंतरही ही धडक वाचवण्यात इसरोला यश आले आहे. खुद्द इसरोनेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. चंद्रयान २ ऑर्बिटर ऑक्टोबरमध्ये नासाच्या LRO सोबत धडक घेणार होता. पण ही धडक होऊ नये म्हणून इसरोने चंद्रयान २ च्या ध्रुवीय कक्षेत बदल केला. उत्तर ध्रुवाजवळ नासाच्या एलआरओची धडक टाळता यावी यासाठी गेल्या महिन्यात ध्रुवीय कक्षेचे स्थान बदलण्यात आले.

गेल्या महिन्यात चंद्रयान २ ऑर्बिटर आणि एलआरओमधील अंतर खूपच कमी राहिले होते. हे दोन्ही समोर येण्याआधीच इसरो आणि नासाकडून या दोघांचेही अंतर तपासण्यात आले होते. अंतराळ यानाच्या वेगामध्ये आणि अंतरामध्ये काही विशिष्ट निकष ठरवण्यात आले. त्यानुसार यानाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न झाला. इसरोकडून याबाबतची माहिती देण्यात आली होती. इसरोने हेदेखील स्पष्ट केले ही अशा प्रकारच्या घटना टाळताना अपघात होऊ नये म्हणून Collison avoidance manoeuvre (CAM) ची गरज भासते. दोन्ही संस्थाचे एकमत झाले की ऑर्बिटर हे त्याच जागेवरून पुढे सरकेल. चंद्रयान २ आणि एलआओ हे चंद्राच्या ध्रुवीय कक्षेतच परिक्रमा करतात. त्यामुळेच हे दोन्ही यान चंद्राच्या ध्रुवावर एकमेकांच्या जवळ येतात.

ट्रॅकिंगसोबतच डेटाच्या माध्यमातूनही या गोष्टीची निश्चिती करण्यात आली होती. त्यामुळे भविष्यातही एलआरओशी कोणताही नजीकचा संबंध नसेल या गोष्टीची खबरदारी घेण्यात आली. अनेकदा अपघात किंवा धडक होऊ नये म्हणून कॅमचा वापर हा सहज पद्धतीने केला जातो. इसरो अशाच पद्धतीच्या घटनांचे ट्रॅकिंग करत असते. त्यामुळेच ज्या पद्धतीचा धोका असतो त्यानुसार बदल करण्यात येत असतात. पण एखाद्या अंतराळ मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच अशा प्रकारचे संकट आले. त्यामुळेच इसरोच्या अनुषंगानेही हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 

First Published on: November 17, 2021 9:33 AM
Exit mobile version