अखेर चांद्रयान-२ कसं कोसळलं ते समोर आलं!

अखेर चांद्रयान-२ कसं कोसळलं ते समोर आलं!

चांद्रयान २ (प्रातिनिधिक छायाचित्र)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO)चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेलं चांद्रयान २ चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलं नसल्यामुळे इस्त्रोसोबतच तमाम भारतीयांचा मोठा हिरमोड झाला होता. संपूर्ण भारतीय बनावटीचं हे चांद्रयान चंद्रावर पाठवण्याचा भारताचा पहिलाच प्रयत्न होता. मात्र, शेवटच्या काही मिनिटांमध्ये चांद्रयान-२ शी इस्त्रोचा संपर्क तुटला आणि ते कुठे गेलं हे कुणालाच कळलं नाही. त्यानंतर अनेक दिवस इस्त्रोचे शास्त्रज्ञ चांद्रयानाचं काय झालं? याचा शोध घेत होते. अखेर त्या शेवटच्या मिनिटांमध्ये नक्की काय झालं? याचा उलगडा झाला आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेमध्ये चांद्रयानाच्या शेवटच्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे. त्यामध्ये चांद्रयान चंद्रावर कोसळलंच होतं (Harsh Landing) अशी माहिती त्यांनी दिली.

नक्की झालं काय?

२२ जुलै रोजी संपूर्ण भारतीय बनावटीच्या चांद्रयान २चं इस्त्रोनं श्रीहरीकोटाच्या केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण केलं. २ सप्टेंबरला ठरल्याप्रमाणे हे यान त्याच्या ऑर्बिटरपासून वेगळं देखील झालं. यानाचं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करण्यासाठी यानाचा वेग ७ सप्टेंबरला कमी करण्यात आला. चंद्रापासून ३० किलोमीटर अंतरावर असताना यानाचा वेग १६८३ किमी प्रतिसेकंदापासून १४६ किमी प्रतिसेकंदपर्यंत कमी करण्यात आला. मात्र, शेवटच्या टप्प्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागापासून ५०० मीटर अंतरावर यान असताना त्याचा वेग सॉफ्ट लँडिंगसाठी कमी होणं आवश्यक होतं. पण तो गरजेपेक्षा जास्त कमी झाला. त्याचा परिणाम म्हणून विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने आदळलं आणि मोहीम अयशस्वी ठरली, अशी माहिती सिंह यांनी दिली.

..आणि इस्त्रोच्या प्रमुखांना रडू कोसळलं!

चांद्रयान मोगीन अयशस्वी झाल्याचं २१ नोव्हेंबर रोजी स्पष्ट झाल्यानंतर देशवासीयांप्रमाणेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये देखील निराशेचं वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यावेळी इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांना रडू कोसळल्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची समजूत काढल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. दरम्यान, चांद्रयान-३ साठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी तयारी देखील सुरू केली असून पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्याचं नियोजन इस्त्रोचे शास्त्रज्ञ करत असल्याची समजतंय.

First Published on: November 21, 2019 12:39 PM
Exit mobile version