पेट्रोल २५ रूपयांनी स्वस्त होणे शक्य – पी. चिदंबरम

तुम्हाला जर कुणी सांगितले की, पेट्रोल १ किंवा २ रूपयांनी नाही तर, २५ रूपयांनी स्वस्त शक्त आहे! तर, तुम्ही म्हणाल काय फेकतोय रे! पण हो खरंच शक्य आहे. हे आम्ही नाही तर देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली. शिवाय, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे. पेट्रोल दरात २५ रूपयांपर्यंतची कपात शक्य असली तरी सरकार त्या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप देखील पी. चिदंबरम यांनी केला आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

पेट्रोलच्या दरात २५ रूपयांपर्यंत कपात शक्य आहे. पण, सरकार १ ते २ रूपयांनी दर कमी करून लोकांची दिशाभूल करेल. असे ट्विट माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे.केंद्र सरकार प्रत्येक लिटरमागे २५ रूपये जास्त घेत आहे. क्रुड ऑईलच्या किमतीवर सरकार लिटरमागे १५ रूपये वाचवत आहे. शिवाय १० रूपये अतिरिक्त कर लावत असल्याचे देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

मागील नऊ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ सुरूच आहे. बुधवारी पहाटे पेट्रोलच्या किमतीत ३० पैशांनी वाढ झाली. त्यानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ७६.८७ रूपयांवर तर मुंबईत ८४.९९ रूपयांवर गेला आहे. मुंबईमध्ये पेट्रोल सर्वात महाग मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील प्रचंड नाराजी पाहायाला मिळत आहे. दरम्यान वाढत्या दरवाढीवर सरकार गंभीर आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पेट्रोलियम कंपन्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीनंतर जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला जाऊ शकतो.

सोशल मीडियावरही ‘भडका’

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत आता सोशल मीडियावर देखील नाराजी पाहायाला मिळत आहे. फेसबुकवर यासंबधीचे विनोदी memes तसेच कोपरखळ्या मारणारी काही व्यंगचित्रे आणि कार्टून्स यांचा अक्षरश: पाऊस पाडला जात आहे.

First Published on: May 23, 2018 9:59 AM
Exit mobile version