‘राष्ट्र प्रथम’ म्हणणाऱ्या अमित शहांच्या मुलाकडून तिरंगा हाती घेण्यास नकार, नेटिझन्सकडून संताप

‘राष्ट्र प्रथम’ म्हणणाऱ्या अमित शहांच्या मुलाकडून तिरंगा हाती घेण्यास नकार, नेटिझन्सकडून संताप

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना भारतीय क्रिकेट संघाने काल आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाला. पण दुसरीकडे दुबईच्या स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या जल्लोषादरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी तिरंगा ध्वज हातात धरायला नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेटिझन्सने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला. हार्दिक पंड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. त्याने 3 गडी बाद करण्याबरोबरच चार चौकार आणि एक षटकारासह 33 धावा केल्या. तोच सामनावीर ठरला. या विजयाचा जल्लोष भारतात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देखील विजयाचा आनंद साजरा करत असल्याचा व्हिडीओ त्यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.

पण दुसरीकडे, जय शहा यांनी तिरंगा हाती घेण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी जय शहा यांना ट्रोल केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. या अभियानातील लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘मन की बात’मध्ये कौतुक केले आहे. पण अमित शहा यांच्याच मुलाने तिरंगा हाती घेण्यास नकार दिल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत, ‘हर घर तिरंगा’ हे फक्त सामान्यांसाठीच आहे का, असा सवाल केला आहे. तर, आणखी एकाने, ढोंगीपणाची ही हद्द असल्याचे म्हटले आहे.

‘राष्ट्र प्रथम’ असे पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगत असतात. आता त्यांच्याच मुलाने राष्ट्रध्वज घेण्यास नकार दिल्याने विरोधक देखील यामुळे आक्रमक झाले आहेत. भाजपाशी संबंधित नसणाऱ्या नेत्याने असे कृत्य केले असते तर काय झाले असते, अशा आशयाचे ट्वीट तेलंगण राष्ट्र समितीचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णन् यांनी केले आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसनेही यावर टीका करताना केंद्रीय गृहमत्र्यांच्या मुलाने राष्ट्रध्वज स्वीकारण्यास नकार का दिला, असा सवाल केला आहे.

…म्हणून कदाचित नकार दिला
जय शहा हे आयसीसी क्रिकेट समितीचे सदस्य देखील आहेत. त्या नियमांनुसार आयसीसीचा सदस्य एका विशिष्ट देशाची बाजू घेऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांनी तिरंगा हाती घेतला नसावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तथापि, जय शहा यांच्याकडून अद्याप अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.

First Published on: August 29, 2022 10:30 AM
Exit mobile version