अजब! सोन्या-चांदीच्या दुकानात चक्क कांदे-बटाट्याची विक्री

अजब! सोन्या-चांदीच्या दुकानात चक्क कांदे-बटाट्याची विक्री

अजब! सोन्या-चांदीच्या दुकानात चक्क कांदे-बटाट्याची विक्री

जगात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. चीनमध्ये उद्यास आलेल्या या कोरोना व्हायरसचा अजूनही कहर सुरुच आहे. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका हा आर्थिक व्यवस्थेला बसला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यामुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. तसेच पोट कसे भरायचे? कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा? असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या समोर उभे आहेत. दरम्यान, या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही लोक आपला उद्योगधंदाच बदलत असल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले असे?

जयपूरमधील रामनगर येथे राहणारे एक २५ वर्षीय हुकमचंद सोनी गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या दुकानात सोन्या-चांदीच्या वस्तू बनवून त्या दागिन्याची विक्री करत होते. त्याच्यावरच ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे पोट भरत होते. मात्र, सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे दागिन्यांची दुकाने बंद आहेत. त्यातच सोन्या – चांदीचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत कुटुंबाचे पोट कसे भरायचे अशी चिंता सतत सोनी यांना होती. दरम्यान, त्यांनी यातून मार्ग काढत आपला रोजगारच बदलण्याचा निर्णय घेतला.

सोनी सांगतात की, ‘मी सोन्या – चांदीच्या अंगठ्या बनवतो. तुटलेल्या असतील तर जोडून देतो, असे मी काम करत होतो. मात्र, गेल्या चार दिवसांपासून मी माझ्या सोन्या – चांदीच्या दुकानामध्ये कांदे – बटाटे विकण्यास सुरुवात केली आहे. सोने – चांदीचे दागिने ठेवण्याच्या जागी आता कांदे – बटाटे ठेवण्याची माझ्यावर वेळ आली आहे. मी दागिने बनवत असलो तरी, माझ्याकडे पैसे नाहीत. त्याशिवाय माझ्या कुटुंबात माझी आई आणि मृत्यू झालेल्या लहान भावाचे कुटुंब आहे. त्यामुळे त्यांचीही जबाबदारी माझ्यावर आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व ठप्प आहे. मात्र, घरात न बसता मी आता भाजीपाला, कांदे – बटाटे विकण्यास सुरुवात केली आहे’.

निर्णय फार कठीण होता

सोनी पुढे सांगतात की, ‘माझ्या सारखी अशी अनेक कुटुंब आहेत. त्यांचीही अशी परिस्थिती आहे. तसेच माझ्यासाठी हा निर्णय फार कठीण होता. एक दागिना घडवणारा भाजीपाला विकणार हे सोपे नव्हते. मात्र, परिस्थितीमुळे हे करणे मला भाग पडले आहे.


हेही वाचा – ‘या’ ५ मोठ्या राज्यांमध्ये कसा लागू आहे लॉकडाऊन ३.०! वाचा…


First Published on: May 4, 2020 11:06 AM
Exit mobile version