पाकिस्तानातील जैशच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

पाकिस्तानातील जैशच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

जैशचा प्रमुख व आंतरराष्ट्रीय अतिरेकी अझहर मसूद

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बऱ्याच दिवसांपासून फरार असलेल्या पाकिस्तानस्थित अतिरेकी अझर मसूद प्रमुख असलेल्या जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यास पकडले आहे. अब्दुल मजीद बाबा असे या अतिरेक्याचे नाव असून त्याच्यावर दोन लाख रूपयांचे इनाम लावण्यात आले होते. जम्मूकश्मिरच्या सोपोर जिल्ह्यातील मागरेपोरा गावात राहणाऱ्या अब्दुल मजीद बद्दल गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती. याआधारे त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली.

एका प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंटही बजावले होते. मात्र अनेक दिवसांपासून तो फरार होता. शनिवारी त्याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले. २००७ साली दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि अतिरेक्यांमध्ये मोठी चकमक उडाली होती. त्यात एक पाकिस्तानी आणि तीन कश्मिरी अतिरेकी पकडले होते. त्याच प्रकरणात असलेला मजीद बावा तेव्हापासून फरार होता.

जम्मू कश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या आणखी एका अतिरेक्याला पोलिसांनी अटक केली. हिलाल अहमद असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा कुपवाडा येथील रहिवासी असून २०१५ पासून फरार होता. त्याच्यावरही २ लाखांचे इनाम ठेवले होते.

First Published on: May 14, 2019 10:29 AM
Exit mobile version