कोरोना नियंत्रणाचे अपयश; जपानचे पंतप्रधान देणार राजीनामा

कोरोना नियंत्रणाचे अपयश; जपानचे पंतप्रधान देणार राजीनामा

संपूर्ण जगभरात संकट उभं केलेल्या कोरोना संसर्गामुळे आता दिग्गजांवर पायउतार होण्याची वेळ आलीय. अशाच एका प्रकरणात जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमधील कोरोना नियंत्रणाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळेच सुगा यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी यापुढे उमेदवारी जाहीर करणार नसल्याचंही सुगा यांनी जाहीर केलंय. गेल्यावर्षी शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुगा यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली. सुगा यांनी शुक्रवारी, सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांना आपण पक्षाच्या नेतृत्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, जपानमध्ये २९ सप्टेंबरला पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. सुगा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते पंतप्रधानपदावरून बाजूला जाणार आहेत. मात्र, नवीन नेत्याची निवड होईपर्यंत पंतप्रधानपदाची सूत्रं त्यांच्या हाती राहणार आहेत. कोरोना संसर्गाचे संकट असतानाही टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्याने सुगा यांच्यावर टीका होत होती. त्यानंतर सुगा यांनी पंतप्रधानपदावरून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. जपानमध्ये कोरोना संसर्गामुळे आणीबाणी लागू करण्यात आली असून, सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या तब्बल १५ लाखांहून अधिक आहे.

First Published on: September 3, 2021 6:45 PM
Exit mobile version