Jitendra Awhad : जेव्हा सांगण्यारखे काही नसते तेव्हाच…; जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधानांवर टीका

Jitendra Awhad : जेव्हा सांगण्यारखे काही नसते तेव्हाच…; जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधानांवर टीका

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा होऊन गेला आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सध्या सगळ्याच पक्षांचा आक्रमकपणे प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये प्रचार सभेत केलेल्या वक्तव्यावर सध्या टीका होते आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदी यांनी सडकून टीका केली आहे. टीका करताना पंतप्रधानांनी मुसलमान समाजाचा उल्लेख केला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी – शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. (Jitendra Awhad angry over pm modis statement that states muslims will share the nations wealth)

जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमध्ये काय?

आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना “घुसपेठीया” या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते. ते काँग्रेसच्या नावावर ढकलून , राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते, असे सांगून टाकले. हे सर्व करताना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते, हेच कळत नाही.

जेव्हा देशाला सांगण्यासारखे काहीच नसते; तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे. एवढं सगळं बोलल्यानंतरही निवडणूक आयोगाला जाग येईल, असे काही वाटत नाही. पण, देशातील निवडणुका आता फक्त द्वेष या एकाच विषयावर लढविल्या जाणार आहेत. कारण की, निवडणुकांमध्ये बदललेली परिस्थिती आणि त्यामुळे सरकलेली पायाखालची वाळू याकडे पाहता त्यांना द्वेष पसरविण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. (Jitendra Awhad angry over pm modis statement that states muslims will share the nations wealth)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ज्यांना बरीच मुले आहेत त्यांना…, पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

काँग्रेसला ‘अर्बन नक्सल’ अशी उपमा देत पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस माता – बहिणींच्या सोन्याचा हिशोब करून ते वाटून टाकतील. जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. म्हणजेच हे तुमची संपत्ती एकत्र करणार आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये त्याचे वाटप करणार. घुसखोरांना ही संपत्ती देणार. तुमच्या कष्टाची, मेहनतीची कमाई अशी कोणालाही द्यायला तुम्ही तयार आहात का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. यावरच आता कॉंग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर टीका होते आहे. त्यातच आमदार आव्हाड यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. (Jitendra Awhad angry over pm modis statement that states muslims will share the nations wealth)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 22, 2024 3:59 PM
Exit mobile version