जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ; कुलगुरुच्या घराची केली तोडफोड

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ; कुलगुरुच्या घराची केली तोडफोड

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुन्हा गोंधळ घातला आहे. जेएनयू प्रशासनाच्या विरोधात सात दिवसापासून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री गोंधळ घातला. या विद्यार्थ्यांनी जेएनयूचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांच्या घराला घेराव घातला. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराची तोडफोड केली. तर त्यांच्या पत्नीला घरातच कैद केले असल्याचा आरोप कुलगुरुंनी विद्यार्थ्यांवर केला आहे. दरम्यान, कुलगुरुंच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अशी घडली घटना 

जेएनयूच्या संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री कुलगुरुच्या घराला घेराव घातल. त्यांच्या घराच्या गेटची, खिडक्यांची तोडफोड केली तर कुलगुरुंच्या घराच्या सुरक्षारक्षकाला देखील मारहाण केली. त्याचसोबत कुलगुरुंच्या पत्नीला कैद करुन ठेवण्यात आले असल्याचा आरोप कुलगुरुंना लावला आहे. विद्यार्थ्यांच्या हल्ल्यात कुलगुरुंच्या पत्नी आणि सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. याआधी देखील जेएनयूच्या वि्दयार्थ्यांनी कुलगुरुला मारहाण आणि धक्काबुकी केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी कुलगुरुंच्या घराबाहेर सुरक्षाव्यवस्था तैनात केली.

का सुरु केले आंदोलन

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात यावर्षी कम्प्युटर आधारीत प्रवेश परिक्षा सुरु केल्याच्या विरोधात सोमवारपासून विद्यार्थी संघटनेच्या आव्हानानंतर काही विद्यार्थी आणि शिक्षक उपोषणाला बसले. ११ विद्यार्थ्यांनी गेल्या आठ दिवसापासून उपोषण सुरु केले होते मात्र प्रशासनाकडून काहीच पाऊल उचलण्यात आले नाही. जेएनयू प्रशासन आणि विद्यार्थी समोरा-समोर आले आहेत. उपोषणा दरम्यान, एक विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली तिला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विद्यार्थी संघटनेने आता देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक विद्यार्थी आणि शिक्षक उपोषणाला बसले आहे. दरम्यान, सोमवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या घराबाहेर गोंधळ घातला.

विद्यार्थी संघटनेने आरोप फेटाळले

कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी ट्विटरवरून सांगितले की, ‘विद्यार्थ्यांनी जबरदस्तीने माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घराची तोडफोड केली. तसेच, माझ्या पत्नीला घरात कैद करुन ठेवले. मी एका मिटिंगमध्ये असताना हा सर्व प्रकार घडला आहे. अशा प्रकारे आंदोलन करण्याचा हा मार्ग आहे का? घरातील एकटी असलेल्या महिलेला घाबरविणे?’ दरम्यान, याप्रकरणी विद्यार्थी संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. आंदोलनाला हिंसक म्हणून विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: March 26, 2019 9:04 AM
Exit mobile version