JP Nadda : नड्डांच्या पत्नीची कार चोरीला; गाडीची महिन्याभरात तीनवेळा विक्री, तिघे अटकेत

JP Nadda : नड्डांच्या पत्नीची कार चोरीला; गाडीची महिन्याभरात तीनवेळा विक्री, तिघे अटकेत

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची टोयोटा फॉर्च्युनर कार वाराणसीतील बेनियाबाग पार्किंगमधून पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कार दिल्लीच्या गोविंदपुरी परिसरातून चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींसाठी शोधमोहीम सुरू आहे. हे सर्व आरोपी फरिदाबादमार्गे वाराणसीला पोहोचले होते. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशमध्ये जाताना त्यांना समजले होते की, ही गाडी जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची आहे, तरीही हे चोरटे बेफिकीरच होते. (JP Nadda : Nadda’s wife’s car stolen, sold thrice in a month)

नड्डा यांच्या पत्नीची कार 18 मार्चच्या रात्री गोविंदपुरी येथून चोरीला गेली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कार शोधण्याची जबाबदारी एसीपी आणि एएटीएसवर सोपवली होती. याप्रकरणी पोलिसांनी लखनऊ येथील आवास विकास कॉलनीतील रहिवासी शिवांश त्रिपाठी आणि अन्य दोन रिसीव्हरना अटक केली असल्याची माहिती दक्षिण-पूर्व पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी दिली. लखीमपूर खेरी येथील सलीम आणि सीतापूर येथील रहिवासी मोहम्मद रईस अशी रिसीव्हर्सची नावे आहेत.

गुन्ह्यात वापरलेली दुसरी कारही पोलिसांनी जप्त केली आहे. याशिवाय अन्य आरोपींना अटक करण्यासाठी आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने कार चोरल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. फरीदाबादच्या शाहिद आणि दिल्लीच्या चंदन होला येथील फारूख यांनी ही कार चोरली होती. शाहिदने ही कार सलीमला विकली, असे एएटीएसच्या चौकशीत समोर आले.

शिवांश त्रिपाठीने दिलेल्या माहितीवरून लखीमपूर खेरी येथे छापा टाकून आरोपी सलीमला पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, सलीमने ही कार मोहम्मद रईसला विकली होती. रईसला अटक करून चौकशी केली असता त्याने अमरोहा येथील रहिवासी फुरकान याला कार विकल्याचे सांगितले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कार वाराणसी येथील पार्किंगमधून जप्त करण्यात आली.

दिल्ली सीमा ओलांडताना पोलिसांना चकमा देण्यासाठी शाहीद फरीदाबादला गेला होता. तेथे त्याने पत्नी आणि मुलांना गाडीत बसवले. ब़डखल येथे गाडीची नंबर प्लेटही बदलण्यात आली. यानंतर ही कार उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमधून वाराणसीला पोहोचली. नंतर ही कार नागालँडला नेण्याचा प्लॅन होता, असे शाहीदने पोलीस चौकशीत सांगितले.

First Published on: April 8, 2024 10:25 AM
Exit mobile version