कर्नाटक विधानसभा निकालानंतर भाजप वि. काँग्रेस ट्विट ‘वॉर’!

कर्नाटक विधानसभा निकालानंतर भाजप वि. काँग्रेस ट्विट ‘वॉर’!

अर्थमंत्री अरुण जेटली

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी, अद्यापही सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपला सरकार स्थापनेसाठी आठ आमदारांची गरज आहे. हा तिढा असताना आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात ट्विट वॉरला सुरुवात झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली आणि काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यात हे वॉर सुरू झालं आहे.

बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपच्या पारड्यात आणखी एका राज्याची भर पडली. मात्र, असे असले तरी सरकार स्थापनेसाठीची रस्सीखेच अजूनही सुरु आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी अरुण जेटली यांच्या २०१७ साली पोस्ट केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट ट्विटरवर ट्विट केले. या ट्विटमध्ये जेटली यांनी, ‘भाजपने नियुक्त केलेल्या राज्यपालांनी गोवा, मणिपूर किंवा मेघालयमध्ये सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रित केले नाही. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकाराला समर्थन केलं. मग हीच पद्धत पाळली जायला हवी, नाही का?’ असं ट्विट केलं होतं. त्यावर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या ब्लॉगवर जेटलींच्या ट्विटसंदर्भातील एक बातमी टाकली आहे. ज्यात जेटलींनी ‘गोव्यातल्या परिस्थितीप्रमाणेच कायदेशीरित्या योग्य ते कर्नाटकमध्ये करावे’, असे लिहिले होते.

एकीकडे काँग्रेसने भाजप नेत्यांचे जुने ट्विट उकरून काढले असताना भाजप नेते तरी कसे गप्प बसणार! या ट्विटवॉरमध्ये भाजपनेही आता उडी घेतली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या २०१७ सालच्या ट्विटचा दाखला दिला. ‘सुरजेवाला यांनी या ट्विटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकार स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित करावे, असे नमूद केल्याचे म्हटले होते. आणि त्याला काँग्रेसचा पाठिंबाही होता’, याची आठवण अमित मालवीय यांनी काँग्रेसला करुन दिली आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांशी दोन हात केल्यानंतर आता हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी सोशल मीडियावर एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. कर्नाटकमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी मैदानात जरी या दोन्ही पक्षांची फिल्डींग सुरू असली, तरी सोशल मीडियावर मात्र एकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे नेटीझन्सची मात्र चांगलीच करमणूक होते हे मात्र नक्की!

First Published on: May 16, 2018 6:17 AM
Exit mobile version