Karnataka Assembly Election : 65.70 टक्के मतदानाची नोंद, शनिवारी निकाल

Karnataka Assembly Election : 65.70 टक्के मतदानाची नोंद, शनिवारी निकाल

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka Assembly Election) बुधवारी मतदान झाले. संध्याकाळी 6 वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सील करण्यात आले. राज्यात एकूण 65.70 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने (EC) दिली.

कर्नाटकमधील 224 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण नंतर-नंतर मतदानात वाढ झाली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान चिकबल्लापूर जिल्ह्यात 76.64 टक्के, तर बीबीएमपी (दक्षिण) येथे सर्वात कमी 48.63 टक्के मतदान नोंदवले गेल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

बंगळुरू ग्रामीणमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 76.10 टक्के मतदान झाले. बागलकोटमध्ये 70.04 टक्के आणि बंगळुरू शहरमध्ये 52.19 टक्के मतदान झाले. बीबीएमपी (मध्य) आणि बीबीएमपी (उत्तर) या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अनुक्रमे 50.10 टक्के आणि 50.02 टक्के मतदान झाले. राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 52.18 टक्के मतदान झाले होते तर, दुपारी 1 वाजता 37.25 टक्के आणि सकाळी 11 वाजपर्यंत 20.99 टक्के मतदान झाले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक पक्षाचे बडे नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रसेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या येथे सभा झाल्या. या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडल्या. त्यात टीका करताना अनेकांची जीभही घसरली.

काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले. पण यावरून वादंग झाल्यानंतर काँग्रेसने सर्वसामान्यांच्या रोजी-रोटीच्या मुद्द्यावर तसेच विद्यमान भाजपा सरकारच्या कथित भ्रष्टाचाराकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. तथापि, आपले खोटेपण चालत नाही, हे पाहून काँग्रेस आता घाबरली आहे. जे प्रचारात सहभागी होत नव्हते, आता त्यांनाही येथे आणले जात आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. आता या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी, 13 मे रोजी होणार आहे.

First Published on: May 10, 2023 10:19 PM
Exit mobile version