मी काँग्रेसच्या दबावाखाली – कुमारस्वामी

मी काँग्रेसच्या दबावाखाली – कुमारस्वामी

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी

मी कर्नाटकमधील साडेसहा कोटी लोकांच्या दबावाखाली नाही तर काँग्रेसच्या दबावाखाली आहे, असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकांकडे जनादेश मागितला होता. पण तो मिळाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

कर्जमाफी देण्यास अयशस्वी ठरल्यास राजीनामा देणार
दिल्ली दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ते सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हे माझे प्राधान्य आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास मी अयशस्वी ठरलो, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन.

लोकांनी मला आणि माझ्या पक्षाला नाकारले
माझ्या पक्षाला बहुमत मिळाले नाही याचा अर्थ लोकांनी मला आणि माझ्या पक्षाला नाकारले आहे. मी पूर्ण बहुमत देण्याची मागणी केली होती. मी शेतकरी नेत्यांची वक्तव्ये ऐकली आणि त्यांनी मला किती पाठिंबा दिला हेही पाहिले. नेता म्हणून माझ्याही काही मर्यादा आहेत. तरीही शेतकरी कर्जमाफीबद्दलचे माझे धोरण स्पष्ट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही माझी प्राथमिकता आहे, असेही ते म्हणाले.

सत्ता स्थापनेनंतर मोदींसोबत पहिली भेट
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली भेट आहे. सोमवारी सकाळी ते दिल्ली रवाना झाले. दुपारी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.

First Published on: May 29, 2018 7:13 AM
Exit mobile version