कर्नाटकातील काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचे अपघाती निधन

कर्नाटकातील काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचे अपघाती निधन

सिद्धू न्यामागौडा कार अपघात (सौजन्य एएनआय)

कारचा झाला चेंदामेंदा, ३ सहकारी जखमी

कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा आज सकाळी कार अपघातात मृत्यू झाला. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांमध्ये न्यामगौडा हे जामखंडी मतदारसंघातूत निवडून आले होते. सकाळी ते गोव्याहून त्यांच्या बागलकोट या गावी जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या कारचा चेंदामेंदा झाला असून इतर ३ सहकारी जखमी असल्याची माहीती मिळत आहे.

गोव्याहून निघाल्यानंतर तुलासिगेरी येथे पोहोचल्यावर त्यांच्या इन्होवा गाडीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी कठड्यावर धडकली. या अपघातात न्यामगौडा यांचा जागीच मृत्यू झाला.

न्यामगौडा केंद्रीय कोळसा मंत्री होते.
न्यामगौडा हे कर्नाटक विधानसभेत यंदा पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी भाजप उमेदवार श्रीकांत सुबराव कुलकर्णी यांचा २ हजार ७९५ मतांनी पराभव केला होता. याआधी १९९०-९१ मध्ये सिद्धू न्यामगौडा हे बगलकोट लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयचा पदभार होता.

कर्नाटक विधानसभेच्या जागा रिकाम्या
सिद्धू यांच्या निधनानंतर काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन ७७ झाली आहे. तर कर्नाटकच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या. तर दोन जागांसाठी अद्याप निवडणुक झालेली नाही. आता सिद्धू यांच्या निधनानंतर कर्नाटक विधानसभेत एकूण तीन जागा रिक्त झाल्या आहेत. या तीन जागांसाठी निवडणुका घेण्यात येतील. या निवडणुक आयोगाने पोटनिवडणुकांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

 

First Published on: May 28, 2018 10:34 AM
Exit mobile version