Kashi Vishwanath corridor: तब्बल २८६ वर्षानंतर काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण, शेकडो वर्षांचा इतिहास

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या मतदार संघातील काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे लोकार्पण करणार आहेत. भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मोदींच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांपैकी काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हा देखील एक ड्रीम प्रॉजेक्ट आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या मंदिराच्या पुर्नेनिर्माणाचे काम सुरू होते. विश्वनाथ मंदिर परिसर हा गंगेच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. काशीमध्ये आल्यावर बाबा विश्वनाथ यांच्या दर्शनाआधी गंगा स्नान करत आचमन करण्याची मान्यता आहे. मात्र आता भाविकांना गंगाजल घेऊन थेट विश्वनाथाचे दर्शन करता येणार आहे.

काय आहे काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास?
वाराणसीतील या काशी विश्ननाथ मंदिराच्या निर्माण आणि पुर्नेनिर्माणाबाबत भाविकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. इतिहासाकारांच्या मते विश्वनाथ मंदिर अकबराच्या दरबारातील नऊ रत्नांपैंकी एक रत्न असलेल्या राजा टोडरमल याने उभारले होते. टोडरमलने विश्वनाथ मंदिराबरोबरच अनेक वेगवेगळ्या वास्तूही उभारल्या .पण त्याने हे काम अकबराच्या आदेशावर केले याचा मात्र कुठलाही पुरावा नाही. त्याला कारणही तसेच आहे. अकबराच्या दरबारात टोडरमलचे स्थान इतके उच्च होते की त्याला कुठलाही निर्णय घेण्यासाठी अकबराच्या आदेशाची ,परवानगीची गरज नव्हती.

असं म्हटलं जात की जवळजवळ शंभर वर्षांनंतर औरंगजेबाने हे मंदिर उद्धवस्त केले. त्यानंतर तब्बल १२५ वर्ष या स्थानावर विश्वनाथ मंदिर नव्हते. नंतर महाराणी अहिल्याबाई यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे पुर्ननिर्माण केले. त्यानंतर आता २८६ वर्षांनंतर या मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. २,००० क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या मंदिरात विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना अरुंद गल्ल्यांमधून यावे लागत होते. मात्र आता निर्माण करण्यात आलेल्या भव्य दिव्य कॉरीडोरच्या लोकापर्णानंतर भाविकांना विश्वनाथाचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिराचे महत्व

अशी आख्यायिका आहे की काशी ही भगवान शिवाच्या त्रिशूलाच्या टोकावर वसलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येथे विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पवित्र शहरांच्या यादीत काशीचे नाव आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की भगवान विश्ननाथ येथे ब्रम्हांडच्या स्वामींच्या रुपात वास्तव्य करतात. काशी हे शिव आणि पार्वतीचे आवडते स्थान असून येथील विश्वनाथ मंदिर हे शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिमेकडील घाटावर हे मंदिर आहे. तसेच पैराणिक कथांनुसार काशीतील बाबा विश्वनाथाच्या दर्शनामुळे पापमुक्ती मिळते. तर मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.

First Published on: December 13, 2021 2:01 PM
Exit mobile version