हिंदू मंदिरात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार मेजवानी

हिंदू मंदिरात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार मेजवानी

प्रातिनिधिक फोटो

केरळातील मंदिरात अनोखा उपक्रम

देशात धार्मिक दुहीमुळे वातावरण दुषित झाले असतानाच केरळमध्ये मात्र धार्मिक सलोख्याचे दुर्मिळ असे चित्र पाहायला मिळाले. केरळमधील लक्ष्मी नृसिंह मूर्ती मंदिरात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. मलप्पुरम जिल्ह्यातील लक्ष्मी नृसिंह मूर्ती मंदिर समितीने परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन केले. सध्या रमजान महिना चालू असून मुस्लिम समुदायासाठी हा पवित्र महिना मानला जातो. हिंदू-मुस्लिम बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे देशभर कौतुक होत आहे.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना मंदिर समितीचे सचिव म्हणाले की, या इफ्तार मेजवानीमध्ये फक्त मुस्लिमच नाही तर परिसरातील हिंदू नागरिक देखील सहभागी झाले होते. याआधी देखील मंदिर समितीने इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन केले होते. समाजातील धार्मिक सलोखा बळकट व्हावा, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. यावर्षीच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून तब्बल ६०० लोकांनी मेजवानीचा आनंद घेतला.

उपक्रमाची सर्वच स्तरातून प्रशंसा

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे सद्स्य हे परिसरातील मुस्लीम बांधवांना घरोघरी जाऊन इफ्तार मेजवानीसाठी आमंत्रण देत आहेत.
मंदिर समितीचे सचिव मोहन नायर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इफ्तारच्या दिवशी मंदिरात अभिषेकही केला जात आहे.
“देशाच्या इतर भागांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण दिसते तसेच हिंसेचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसते, पण सुदैवाने या परिसरात अशा घटना घडत नाहीत. येथे हिंदू आणि मुस्लीम समाजातील लोक हे गेली अनेक वर्ष शांततेत राहत आहेत. ही शांतता, सामाजिक सलोखा टिकवून राहावा, यासाठी असे उपक्रम आम्ही राबवत असतो.” असेही माध्यमांशी बोलताना नायर म्हणाले.

First Published on: May 28, 2018 10:17 AM
Exit mobile version