पोलिसाला चार किलोमीटर फरफटत नेणाऱ्या केशव उपाध्यायला अटक, पिस्तुलही सापडले

पोलिसाला चार किलोमीटर फरफटत नेणाऱ्या केशव उपाध्यायला अटक, पिस्तुलही सापडले

इंदौर – गाडी चालवत असताना फोनवर बोलत असल्याने ट्राफिक पोलिसांनी नियमभंग केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगतिले. मात्र, गाडीमालकाने या ट्राफिक पोलिसाला तब्बल ४ किलोमीटर गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले. इंदौरमध्ये सोमवारी ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे आरोपी चालकाला अटक केली असता त्याच्या गाडीत पिस्तुल, जिवंत काडतुसे सापडली. केशव उपाध्याय असं आरोपी चालकाचं नाव आहे.

इंदौर येथील सत्य साई चौकात सुरेंद्र सिंह आणि त्यांचा समूह वाहतूक नियंत्रणासाठी तैनात होता. त्यांच्याकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. या दरम्यान, ट्राफिक पोलिसाने हात दाखवून एका गाडी थांबण्याचा इशारा केला. परंतु, कारचालकाने वाद घालत गाडीचा वेग वाढवला. यामुळे ट्राफिक पोलीस गाडीच्या बोनेटवर ढकलला गेला. तब्बल ४ किमी गेल्यानंतर ट्राफिक पोलीस बोनेटवरून खाली पडले.


नेमकं काय घडलं?

केशव उपाध्याय या कारचालकाला देवास नाका येथे ट्राफिक पोलिसांनी फोनवर बोलताना पाहिलं होतं. त्यामुळे ट्राफिक पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. कारचालकाने गाडी थांबवल्यानंतर ट्राफिक पोलिसांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. मात्र, त्याने दंड भरण्यास नकार दिला आणि गाडी जोरात पळवली. त्यामुळे ट्राफिक पोलिसांना गाडीचा धक्का लागला आणि ते गाडीच्या बोनेटवर आपटले.

कार वेगाने पळत होती त्यामुळे ट्राफिक पोलिसांनी दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवलं होतं. ट्राफिक पोलीस खाली पडावा याकरता वाहनचालक जोरात ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत होता, तर जाणीवपूर्वक कट मारण्याचाही प्रयत्न करत होता. परंतु, ट्राफिक पोलिसांनी बोनेट घट्ट पकडून ठेवले होते. दरम्यान, वाहतूक नियोजन अधिकारी सुरेंद्र सिंह पाठीमागून बुलेट घेऊन आले. त्यांनी ट्रक आणि इतर वाहनचालकांना सांगून आरोपीच्या वाहनापुढे गाड्या उभ्या करण्यास सांगितल्या. त्यामुळे संबंधित आरोपीने त्याची गाडी थांबवली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता त्याच्या गाडीत पिस्तुल, काडतुसे अशी शस्त्र सापडली. या शस्त्रांचे परवानेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First Published on: December 12, 2022 5:54 PM
Exit mobile version