अमृतपाल सिंगने मागणी केली ती ‘सरबत खालसा’ म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

अमृतपाल सिंगने मागणी केली ती ‘सरबत खालसा’ म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांची मोहीम सुरूच आहे. परंतू अद्याप अमृतपाल सिंग पोलिसांच्या हाती लागला नाही. अशात अमृतपाल सिंगचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधून अमृतपाल सिंगने पोलिसांना खुलं चॅलेंज दिलंय.

अमृतपाल सिंगने बुधवारी व्हिडीओ जारी केलाय. या व्हिडीओमधून अमृतपालने पोलिसांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. यात त्याने बैसाखीच्या निमित्ताने सरबत खालसा बोलवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी त्याने पंजाब पोलिसांवरही टीका केली आहे. “हे फक्त माझ्या अटकेचे प्रकरण नाही. मला अटक होण्याची भीतीही वाटत नाही. पोलिसांचा हेतू मला अटक करण्याचा असता तर त्यांनी मला घरून अटक केली असती आणि मी शरणही गेलो असतो. आपल्यावरील पोलिसांची कारवाई हा शीख समुदायावरील ‘हल्ला’ असल्याचा दावा देखील त्याने या व्हिडीओमधून केला आहे.
या व्हिडीओमध्ये अमृतपालने श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदारांना बैसाखीच्या दिवशी सरबत खालसा बोलावण्याचे आवाहन केलं आहे. जातीय प्रश्न सोडवण्यासाठी सरबत खालसा बोलवावा, असं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
या व्हिडीओमधून अमृतपाल यांनी भारत आणि परदेशात राहणाऱ्या शीख लोकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचं आवाहन देखील केलंय. शिख समुदायातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. सरकारने महिला आणि मुलांवर अनेक अत्याचार केले आहेत. अकाल तख्तचा अल्टिमेटमही सरकारने मान्य केला नाही. जथेदारांनी भूमिका घेऊन सरबत खालसामध्ये सहभागी व्हावे. जथेदारांनी १३ एप्रिल रोजी दमदमा साहिब, तलवंडी साबो येथे सरबत खालसा बोलवावा, असं देखील अमृतपाल सिंग म्हणाला.

जाणून घेऊया सरबत खालसा म्हणजे नक्की काय आहे?
सरबत म्हणजे सगळे आणि खालसा म्हणजे शीख. सरबत खालसा म्हणजे सर्व शीखांची सभा. शिखांचे चौथे गुरु रामदास यांच्या काळात १६व्या शतकात एक प्रथा सुरू झाली. यामध्ये शीख समुदाय वर्षातून दोनदा एकाच ठिकाणी जमत असे. हा मेळावा बैसाखी आणि दिवाळीला व्हायचा. समाजातील सर्व लोक एकत्र जमायचे आणि गुरूंसोबत मिसळायचे. कालांतराने शिखांची ही सभा त्यांच्या आजूबाजूच्या समाजात आणि राजकारणात होत असलेल्या बदलांच्या चर्चेचे केंद्र बनू लागली.

1716 साली बंदा सिंग बहादूरच्या हौतात्म्यानंतर खालसाचं विघटन झालं. त्यांनी आपला सेनानायक गमावला होता. दुसरीकडे, मुघल सैन्य शिखांवर कहर करत होते. या हत्याकांडाच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी दल खालसा स्थापन करण्यात आला. हा दल खालसा पुढे तरुण आणि वयस्कर दल बनला आणि हा शीख मिसल म्हणजेच शीखांच्या लष्करी तुकड्यांचा आधार बनला. पुढे जाऊन बंदा सिंग हे तेच व्यक्ती आहेत ज्यांना मरणापूर्वीच गुरु गोविंद सिंग यांनी शिखांचा नेता बनवलं होतं.

18 व्या शतकात 10 व्या गुरू गुरू गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर, शीख मिसल किंवा लष्करी तुकड्यांनी, समाजासाठी अधिक महत्त्व असलेल्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी सरबत खालसा आयोजित करण्यास सुरुवात केली. युद्ध रणनीतीवर चर्चा करण्यासाठी शीख मिसल अकाल तख्तवर भेटत असत.

कोण आहेत हे पाच तख्तांचे जथेदार?
खरं तर, १३ एप्रिल १६९९ रोजी बैसाखीच्या दिवशी श्री गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. गुरू गोविंद सिंग यांनी प्रथम 5 पंच प्यारे यांना अमृत प्यायला लावले होते आणि स्वतःही त्या पाच पंच प्यारेंच्या हातून अमृत प्यायले होते. या पाच पंच प्यारे पैकी भाई दया सिंग जी, धरम सिंग, हिम्मत सिंग, मोहकम सिंग आणि साहिब सिंग यांची निवड गुरु गोविंद सिंग यांनी केली होती. शीख धर्माच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या कार्याची देखरेख या पंच प्यारांकडे सोपवण्यात आली होती. हे तेच पंच प्यारे आहेत जे वेळोवेळी बदलत राहतात.

२६ जानेवारी १९८६ रोजी तब्बल २०० वर्षांनंतर पहिल्यांदाच सरबत खालसा उघडपणे बोलावण्यात आला. सुवर्ण मंदिरात झालेल्या याच सरबत खालसामध्ये भारत सरकारच्या खर्चाने अकाल तख्त बांधण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. लाखो शीखांच्या उपस्थितीत ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान नुकसान झालेल्या अकाल तख्तची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरबत खालसानेही शीख स्वराज्यासाठी लढण्याचा निर्णय घेतला. या सभेला भारत सरकारने एकप्रकारे मान्यता दिली होती. कारण त्यात भारत सरकारने अकाल तख्त स्वखर्चाने बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तो फेटाळण्यात आला. कारसेवेच्या माध्यमातून अकाल तख्त बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऑपरेशन ब्लू स्टारनंतर अकाल तख्तचे दोन जथेदार हटवण्यात आले. ग्यानी साहिब सिंग, सुवर्ण मंदिराचे मुख्य ग्रंथी (पुजारी) आणि अकाल तख्तचे जथेदार ग्यानी किरपाल सिंग यांच्या जागी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे पुतणे जसबीर सिंग रोडे आणि जगतार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली.

त्याच वर्षी २९ एप्रिल १९८६ रोजी ‘सरबत खालसा’ची बैठक झाली. ज्यामध्ये सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तच्या पुनर्बांधणीची घोषणा करण्यात आली होती. त्याच सुवर्ण मंदिर संकुलात फुटीरतावादी शीखांच्या मेळाव्याने खलिस्तानचे स्वतंत्र राज्य घोषित केले आणि इतर राष्ट्र-राज्यांना ‘खलिस्तान’चे सरकार ओळखण्याचे आवाहन केले.

खरं तर २० व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच तो कोण आयोजित करू शकतो? यावरून सरबत खालसा बोलवण्याबाबत वाद सुरू आहे, अकाल तख्तला अशी बैठक बोलावण्याचा अधिकार असला तरी सध्या अकाल तख्त ही शीखांची सर्वोच्च धार्मिक संस्था आहे. 10 नोव्हेंबर 2015 रोजी शिरोमणी अकाली दलाचे नेते सिमरनजीत सिंह मान आणि संयुक्त अकाली दलाचे नेते मोहकम सिंह यांनी सरबत खालसा बोलावला होता. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि पंजाब आणि आसपासच्या गुरुग्रंथ साहिबच्या अपमानाच्या घटनेच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली होती.

First Published on: March 30, 2023 4:34 PM
Exit mobile version