दिल्लीतील शेतकरी आंदोलन अखेर मागे, सरकारवर नाराजी

दिल्लीतील शेतकरी आंदोलन अखेर मागे, सरकारवर नाराजी

शेतकरी युनियनची सरकारवर नाराजी (सौजन्य- ANI)

राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी शेतकऱ्यांनी भव्य आंदोलन केले होते. साखर कारखान्यांना अनुदान, शेतमालाला हमीभाव, शेतीच्या कामांसाठी मोफत वीज तसंच विनाअट कर्जमाफी अशा अनेक मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी हरिद्वार ते दिल्ली अशी ‘किसान क्रांती पदयात्रा’ काढली होती. मात्र, अखेर मंगळवारी दिल्लीतील किसान घाटावर जाऊन तिथे फुलं वाहून ही यात्रा संपली असल्याचे जाहीर करण्यात आले. भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी हे आंदोलन संपल्याचे जाहीर केले. ‘आम्ही आमच्या हक्कांसाठी लढा देतच राहणार, आमच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा सरकारविरोधी लढा चालू राहिल’, असं वक्तव्य नरेश टिकैत यांनी किसान घाट इथे केलं. मात्र, काल हे आंदोलन खूपच चिघळलं होतं. आंदोलनकर्ते शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहचताच त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला गेला. शेतकऱ्यांना दिल्लीच्या हद्दीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली होती. काही वेळातच हे प्रकरण इतकं चिघळलं की शेकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुर, पाण्याचे फवारे आणि लाठीचार्जचा वापर करण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री साडेबारा वाजता उत्तर प्रदेश सीमेवरुन दिल्लीत प्रवेश देण्यात आला. दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स हटवत शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये प्रवेश खुला करुन दिला.


रात्री उशीरा दिल्लीत प्रवेश मिळाल्यानंतर रस्त्यावर ताटकळलेले शेतकरी, आपले ट्रॅक्टर घेऊन मोठ्या संख्येने दिल्लीच्या दिशेने निघाले. उत्तर प्रदेश गेट आणि लिंक रस्त्यावर रात्री उशीरापर्यंत ३ हजारहून जास्त शेतकरी उपस्थित होते. दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या ११ मागण्यांपैकी ७ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर ४ मागण्या प्रलंबित ठेवण्यात आल्या असल्यामुळे शेतकरी युनियनकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप भारतीय किसान यूनियनकडून लावण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

First Published on: October 3, 2018 9:43 AM
Exit mobile version