राम जन्मभूमीनंतर आता कृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू! कोर्टात याचिका दाखल!

राम जन्मभूमीनंतर आता कृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू! कोर्टात याचिका दाखल!

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढल्यानंतर त्यावर अखेर पडदा पडला होता. मात्र, राम जन्मभूमीचा वाद संपल्यानंतर आता कृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू झाला आहे. मथुरेमध्ये ज्या ठिकाणी कृष्ण जन्मस्थान मंदिर आहे, त्या जागेची मालकी भगवान श्रीकृष्ण यांच्याच नावे व्हायला हवी, अशी मागणी करणारी याचिका मथुरा कोर्टात दाखल करण्यात आली आहे. जवळपास १३.३७ एकरच्या या जमिनीचा १९७३ साली श्रीकृष्ण जन्मस्थान सोसायटीने व्यवहार करून तिची डिक्री केली होती. या जमिनीवर कमिटी ऑफ मॅनेजमेंट ट्रस्ट शाही मस्जिद इदगाहने सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डच्या सहमतीने अतिक्रमित बांधकाम केलं आहे. मात्र, खुद्द भगवान श्रीकृष्ण या जमिनीचे मूळ मालक असून जन्मस्थान सोसायटीने केलेली डिक्री रद्द व्हावी आणि अतिक्रमण हटवण्यात यावं, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मथुरेत होतं कंसाचं कारागृह!

आज ज्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्ममंदिर आहे, ती जागा ५ हजार वर्षांपूर्वी मल्लपुरा म्हणून ओळखली जात असल्याचं सांगितलं जातं. इथल्या कटरा केशव देवमध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा मामा कंसचं कारागृह होतं. तिथेच रोहिणी नक्षत्राच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाल्याचा म्हटलं जातं.

भगवान श्रीकृष्ण यांनाच मालकी द्या!

दरम्यान, या संबंधी न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमध्ये या १३.३७ एकर जागेची मालकी भगवान श्रीकृष्ण यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता हरीशंकर जैन आणि विष्णुशंकर जैन यांनी मथुराच्या वरीष्ठ न्यायाधीश छाया शर्मा यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, कमिटी ऑफ मॅनेजमेंट ट्रस्ट शाही मस्जिद इदगाह, श्रीकृष्ण जन्म भूमी ट्रस्ट, श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

First Published on: September 26, 2020 8:05 PM
Exit mobile version