भारत – चीनच्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद; ४३ चीनीही ठार

भारत – चीनच्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद; ४३ चीनीही ठार

भारत आणि चीनमध्ये लडाख येथील गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या सैनिकांच्या धुमश्चक्रीत चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले असून ४३ चीनींचा खात्मा झाल्याची माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तातून समोर येत आहे. सोमवारी रात्री भारत आणि चीनी सैनिकांमध्ये गलवानच्या खोऱ्यात झटापट झाली. या मारहाणीत भारताचे एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आज दुपारी आले होते. दोन्ही सैन्य दलाकडून धक्काबुक्की, दगडफेक, झटापट आणि टोकदार तारेपासून बनवलेल्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला.

तब्बल ४५ वर्षानंतर एलएसीवर गोळीबार 

भारत आणि चीनमधील लाईन ऑफ अॅक्चुअर कंट्रोल (एलएसी) येथे काल रात्रीपासून दोन्ही सैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात तब्बल ४५ वर्षानंतर काल पहिल्यांदा भारत-चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, लडाखच्या गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या भारत आणि चीन सैनिकांमधील चकमकीत चीनच्या पाच सैनिकांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आल्याचे वृत्त काही तासांपूर्वी समोर आले होते. तर त्यांचे ११ जवान जखमी झाल्याचेही सांगण्यात आले होते. ही माहिती हाँगकाँगच्या ग्लोबल टाईम्सच्या वरिष्ठ पत्रकार वँग वेनवेन यांनी ट्विट करत दिली. असे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या बातमीला मात्र चीनच्या सरकारने दुजोरा दिलेला नाही.

मंगळवारी रात्री तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत चर्चा केली. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यांच्यातही लडाखमधील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते. चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय जवानांनी दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच, भारतीय जवानांनी आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा –

‘कोरोना विरुद्धच्या लढाईतील पोलीस योद्धांना आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार’

First Published on: June 16, 2020 10:17 PM
Exit mobile version