सलाम! अवघ्या महिन्याभराच्या बाळाला घेऊन महिला आयएएस ड्युटीवर हजर!

सलाम! अवघ्या महिन्याभराच्या बाळाला घेऊन महिला आयएएस ड्युटीवर हजर!

फोटो - अमर उजाला

आख्खा देश कोरोनाविरोधात लढा देत असताना या लढ्यात प्रत्येकजण आपापल्या परीने हातभार लावत आहे. जिथे सामान्य नागरिक घरातच राहून या लढ्यात सहभागी झाले आहेत, तिथे आरोग्य विभागातले डॉक्टर-अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी खऱ्या अर्थाने समोर येऊन कोरोनाशी दोन हात करत आहेत. त्यामुळे त्यांना सर्वाधिक कोरोनाचा धोका असल्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, असं सगळं असताना एक महिला आयएएस अधिकारी अवघ्या महिन्याभराच्या आपल्या बाळाला घेऊन कामावर हजर झाली आहे. ही गोष्ट आहे विशाखापट्टणम नगर निगमच्या आयुक्त जी श्रीजना यांची!

श्रीजना यांनी महिन्याभरापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या प्रसूती रजेवर होत्या. पण त्यानंतर अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचारी-अधिकारी कोरोनाशी लढण्यासाठी कामावर रुजू झाले. सगळे कामावर असताना श्रीजना यांना घरी स्वस्थ बसवेना. अखेर त्यांनी कामावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचं शहर त्यांची वाट पाहात होतं.

दर चार तासांनी बाळासाठी घरी जातात!

पण कामावर जायचं, तर बाळाचं काय? अवघ्या महिनाभराच्या त्या बाळाला आईची नितांत आवश्यकता होती. मात्र, कोरोनाच्या या भयंकर संकटामध्ये श्रीजना यांनी आपल्या कर्तव्याला पहिलं प्राधान्य दिलं. मात्र, बाळाची काळजी घ्यायलाही त्या विसरल्या नाहीत. त्या कामावर रुजू तर झाल्या, मात्र दर चार तासांनी त्या त्यांच्या घरी जातात आणि बाळाला दूध पाजतात. त्यानंतर पुन्हा कामावर हजर होतात. आणि जेव्हा अगदीच शक्य नसेल, तर त्या बाळाला हातात घेऊनच आयुक्तपदाच्या खुर्चीवर बसतात.

श्रीजना म्हणतात की त्यांचे पती आणि त्यांच्या आईच्या पाठिंब्यामुळेच त्यांना कर्तव्याला प्राधान्य देणं शक्य होतं. त्या जेव्हा कार्यालयात कोरोनाशी लढा देण्यात गुंतलेल्या असतात, तेव्हा घरी त्यांचे पती किंवा त्यांच्या आई बाळाला सांभाळतात. अशा संकटसमयी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या महिला अधिकाऱ्याला आणि तिच्यातल्या मातेला सलाम!

First Published on: April 12, 2020 5:38 PM
Exit mobile version