लालू प्रसाद यादव गमावू शकतात १२८ कोटींची मालमत्ता

लालू प्रसाद यादव गमावू शकतात १२८ कोटींची मालमत्ता

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या पटना आणि दिल्लीतील मालमत्ता गमावण्याची परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांची प्रॉपर्टी जप्त होण्याची शक्यता आहे. नवीन बेनाम संपत्तीच्या कायद्यांतर्गत मालमत्तेसंदर्भात लालूंना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. लालूंची तब्बल १२८ कोटींची मालमत्ता यादव कुटुंबिय गमावण्याची शक्यता आहे.

कुटुंबियांच्या नावे केली मालमत्ता 

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना शेल कंपन्यांच्या मार्फत त्यांच्या नातेवाइकांनी ही मालमत्ता अत्यंत कमी किमतीत खरेदी केली होती. त्यानंतर ही मालमत्ता लालू प्रसाद यादव यांनी त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलांच्या नावावर करून घेतली होती. आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लालूच्या या मालमत्तेची एकूम किंमत ही तब्बल १२७.७५ कोटी आहे. या मालमत्तेत पाटण्यात तयार होत असलेला एक मॉल, दिल्लीतील आलिशान बंगला आणि दिल्ली एअरपोर्ट जवळचे एक शेत इतक्या गोष्टींचा समावेश आहे. बेनाम संपत्तीच्या कायद्याअंतर्गत लालू प्रसाद यादव दोषी आढळल्यास त्यांना ७ वर्षाचा तुरुंगवास आणि मालमत्तेची बाजारभावानुसार असलेल्या एकूण किंमतीच्या २५ टक्के हिस्सा दंड भरावा लागणार आहे.

लालूंना ७ वर्षांची शिक्षा 

लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं असून त्यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता.

First Published on: October 23, 2018 1:00 PM
Exit mobile version