कृषी कायद्यांप्रमाणे CAA आणि NRC कायदे मागे घ्या; ओवैसी यांची मागणी

कृषी कायद्यांप्रमाणे CAA आणि NRC कायदे मागे घ्या; ओवैसी यांची मागणी

कृषी कायद्यांप्रमाणे सीएए आणि एनआरसी कायदे मागे घ्या, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. विधानसभा निवडणुकीसाठी ओवैसी उत्तर प्रदेशमध्ये आहेत. बाराबंकी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) रद्द करण्याची मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांवर टीका करताना ओवैसी म्हणाले की, हे सर्व राजकारणाऐवजी रंगभूमीमध्ये असले पाहिजेत. मोदी बॉलिवूडमध्ये असते तर त्यांनी सर्व पुरस्कार जिंकले असते, अशी टीका ओवैसी यांनी केली. पंतप्रधान आणि जवळपास सर्वच भाजप नेत्यांनी आंदोलकांना देशद्रोही तसंच दहशतवादी संबोधलं होतं. उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, पंतप्रधान शेतकऱ्यांची माफी मागत आहेत, असं ओवैसी म्हणाले.

शेतकरी आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन होत असून येत्या निवडणुकीत काय नुकसान होणार आहे याची जाणीव झाली आहे. यामुळेच कृषी कायदे रद्द करण्यात आले, असं म्हणत सीएए आणि एनआरसी देखील असंवैधानिक आहेत आणि म्हणून ते मागे घेतले पाहिजेत, अशी मागणी ओवैसी यांनी केली. लखीमपूरच्या घटनेचा आणि शेतकऱ्यांवरील अत्याचाराचा उल्लेख करून ओवैसी म्हणाले की, केंद्रीय मंत्री टेनी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, कारण यामुळे भाजपला ब्राह्मण मतांचे नुकसान होईल. भाजपला सवर्णांची मते गमावायची नाहीत, त्यामुळेच टेनी अजूनही मंत्रिमंडळात आहेत, अशी टीका ओवैसी यांनी केली.

दरम्यान, ओवैसी यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये एमआयएम किमान १०० जागांवर निवडणूक लढवेल आणि निकालांनी अनेकांना आश्चर्यचकित करेल, असं म्हटलं. यूपी निवडणुकीत युतीसाठी अजूनही काही छोट्या पक्षांशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी देखील माहिती ओवै,सी यांनी दिली.

 

First Published on: November 22, 2021 10:04 AM
Exit mobile version