Liquor Policy Case : सीबीआयच्या आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांचे नाव

Liquor Policy Case : सीबीआयच्या आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांचे नाव

नवी दिल्ली : दिल्लीतील दारू धोरण (Liquor Policy Case) प्रकरणात सीबीआय आणि ईडी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी करत आहे. दिल्लीतील दारू धोरण प्रकरणी सीबीआयने मंगळवारी राऊस ऍव्हेन्यू न्यायालया आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात पहिल्यांदाच मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या नावाचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दारू धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सिसोदिया सध्या 1 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. सिसोदिया यांच्याशिवाय बुची बाबू, अर्जुन पांडे, अमनदीप ढल आणि भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या कविता यांचाही आरोपपत्रात नाव आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींच्या भूमिकेबाबत एजन्सी पुढील तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राऊस ऍव्हेन्यू कोर्टात सीबीआयने पाच महिन्यांपूर्वी मद्य धोरण प्रकरणात 7 आरोपींविरुद्ध 10,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात अटक करण्यात आलेले दोन व्यापारी, एका वृत्तवाहिनीचे प्रमुख, हैदराबादचे मद्यविक्रेते, दिल्लीतील मद्य वितरक आणि उत्पादन शुल्क विभागाचे दोन अधिकारी यांचा समावेश होता, मात्र सिसोदिया यांचे नाव नव्हते. आरोपपत्रात विजय नायर, अभिषेक बोईनपल्ली, अरुण पिल्लई, समीर महेंद्रू, गौतम मुथा, कुलदीप सिंग आणि नरेंद्र सिंग यांची नावे होती.

निविदा परवाना शुल्क माफ केल्याचा आरोप
मनीष सिसोदिया यांनी उपराज्यपालांच्या मंजुरीशिवाय मद्य धोरण बदलले होते. कोरोना महामारीच्या नावाखाली सरकारने 144.36 कोटी रुपयांचा निविदा परवाना शुल्क माफ केले होते. याचा फायदा दारू ठेकेदारांना झाला आणि यातून मिळालेल्या कमिशनचा आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत वापर केल्याचा आरोप दिल्लीचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.

ईडीने तिहार तुरुंगात केली चौकशी
ईडी अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात जाऊन मनीष सिसोदिया यांची चौकशी केली होती. यावेळी नवीन दारू धोरण बनवताना दक्षिण दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून 100 कोटींची लाच घेतल्याचे ईडीने सांगितले होते. ईडीने या प्रकरणी हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांना ६ मार्च रोजी अटक केली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कवितेचे नावही या प्रकरणी पुढे आले आहे.

First Published on: April 25, 2023 6:16 PM
Exit mobile version