निजामुद्दीन मरकजप्रकरण: काश्मिरमधील ८५५ लोकांची यादी; जम्मूतील ६ जण क्वारंटाइन

निजामुद्दीन मरकजप्रकरण: काश्मिरमधील ८५५ लोकांची यादी; जम्मूतील ६ जण क्वारंटाइन

राजधानी दिल्लीत निजामुद्दीन दर्ग्यावर झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या जम्मू – काश्मिरच्या लोकांचा शोध घेतला जात आहे. सरकारने अशा ८५५ लोकांची यादी बनवली आहे, जे या कार्यक्रमात सहभागी होते तसेच यामध्ये सहभागी असलेल्यांच्या संपर्कात होते. तर जम्मूमध्ये अशा ६ जणांना क्वारंटाइनदेखील करण्यात आले आहे. एकूण ५० पानांच्या यादीमध्ये जम्मूतील ८३ लोकांचा समावेश असून उर्वरित लोकं ही काश्मिरमधील आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहुतांश लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समजल्यानंतर परिसरात एकच गदारोळ माजला. कार्यक्रमातून परतलेल्या जम्मू-काश्मिरमधील सर्वाधिक नागरिकांनी त्यांचा प्रवास इतिहास लपवला असून सध्या विविध भागांमध्ये ते राहत आहेत. या सर्वांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्याची मोहिम युद्धपातळीवर सरकार करत आहे.

हेही वाचा – Coronavirus Breaking: निजामुद्दीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मौलवीवर गुन्हा दाखल

प्रदेश सरकारचे प्रवक्ता रोहित कंसल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सुरक्षेखातर ही यादी बनवण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्याकरता उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. तसेच वेळीच लोकांची ओळख पटवून देण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. दरम्यान, नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो. मात्र त्यातून कोरोना संशयितांची ओळख पटणार असून इतरांना त्यांच्यापासून दूर ठेवता येणार आहे. तसेच या प्रक्रियेत लोकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे हे प्रकरण 

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात तबलीगी मरकज प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता कारवाई केली असून येथील धार्मिक सभा आयोजित करणाऱ्या मौलानाला ताब्यात घेतले आहे. या मौलानावर भारतीय दंड विधान कायद्यानुसार कलम २६९, २७०, २७१, १२० ब च्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. काही वेळापुर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला होता. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश देताना त्यांनी उपराज्यपाल यांना कारवाई संदर्भातली फाईल पाठवली होती. त्यानंतर लगेचच उपराज्यपाल यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

First Published on: March 31, 2020 10:18 PM
Exit mobile version