Lockdown 4.0 : अखेर देशभरात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर, नव्या नियमांची घोषणा!

Lockdown 4.0 : अखेर देशभरात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर, नव्या नियमांची घोषणा!

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे रुग्ण कमी होत नसून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. देशातल्या रुग्णांची संख्या ९० हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता देशात चौथ्या लॉकडाऊनची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे. या चौथ्या लॉकडाऊनचे काही नियम सरकारने नव्याने जाहीर केले आहेत. त्यामध्ये विमानसेवा, मेट्रो सेवा, रेल्वे सेवा, मॉल, थिएटर, शाळा, धार्मिक स्थळं, शॉपिंग मॉल्स, शाळा बंदच राहणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत कर्फ्यू लागू ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने सर्व मंत्रालयं आणि राज्य सरकारांना लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या स्थलांतरीत मजुरांना या चौथ्या लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. दोन्ही राज्यांची परवानगी असेल, तर आंतरराज्यीय प्रवासाला मुभा देण्यात आली आहे.

रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी आंतरराज्यीय प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. असं करताना केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार जिल्ह्यांचे रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये वर्गीकरण करण्याची राज्य सरकारांना मुभा असेल, असं देखील जाहीर करण्यात आलं आहे. त्याशिवाय, स्टेडियम खुली करण्याची परवानगी दिली असली, तरी त्यामध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

 

First Published on: May 17, 2020 7:10 PM
Exit mobile version