Lok Sabha 2024 : रिंगणात गर्भश्रीमंत अन् गरीब देखील, 622 कोटींपासून 500 रुपयांपर्यंत…

Lok Sabha 2024 : रिंगणात गर्भश्रीमंत अन् गरीब देखील, 622 कोटींपासून 500 रुपयांपर्यंत…

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 88 जागांचा समावेश आहे. एकूण 1202 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यातील काही करोडपती आहेत तर, काही उमेदवारांकडे शेकड्याच्या प्रमाणात संपत्ती आहे. पहिल्या पाच श्रीमंत उमेदवारांमध्ये तीन कर्नाटकचे आहेत. तर, पाच गरीब उमेदवारांमध्ये महाराष्ट्र आणि केरळमधील प्रत्येकी दोन उमेदवार आहेत.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वात कमी मालमत्ता असलेले पाच उमेदवार आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राच्या नांदेडमधील अपक्ष उमेदवार लक्ष्मण नागोराव पाटील आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे केवळ 500 रुपयांची संपत्ती आहे. लक्ष्मण पाटील यांच्यानंतर अपक्ष उमेदवार राजेश्वरी केआर यांचा क्रमांक लागतो. त्या केरळमधील कासारगोडमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपली संपत्ती 1 हजार रुपये असल्याचे निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : आवाहन करूनही मतदानाची टक्केवारी वाढेना, नेत्यांना चिंता

महाराष्ट्रातील अमरावती येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे पृथ्वीसम्राट दीपवंश हे या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1 हजार 400 रुपये आहे. याशिवाय, राजस्थानच्या जोधपूरमधून दलित क्रांती दलाच्या नेत्या शहनाज बानो निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी 2 हजार रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. व्हीपी कोचुमन यांना सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियाने (कम्युनिस्ट) कोट्टायम, केरळमधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडे 2 हजार 230 रुपयांची संपत्ती असून ते यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.

गर्भश्रीमंत नेत्यामध्ये तिघे कर्नाटकचे

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते व्यंकटरमाने गौडा हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांना ‘स्टार चंद्रू’ म्हणून ओळखले जाते. एचडी कुमारस्वामी यांच्याविरोधात निवडणूक लढवत असलेल्या गौडा यांच्याकडे 622 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर, कर्नाटकातीलच काँग्रेसचे खासदार डीके सुरेश यांची संपत्ती 593 कोटी रुपये आहे. या टप्प्यातील ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. सुरेश हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे धाकटे भाऊ आहेत. यावेळी तो बंगळुरू ग्रामीणमधून पुन्हा नशीब आजमावत आहेत.

भाजपा खासदार हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. 278 कोटी रुपयांच्या संपत्तीसह त्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते संजय शर्मा चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 232 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी पाचव्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती 217.21 कोटी रुपये आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : देशात EVMवरच होणार मतदान; बॅलेट पेपर संदर्भातील याचिका SCने फेटाळल्या


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 26, 2024 3:43 PM
Exit mobile version