Lok Sabha 2024 : निवडणुकांच्या नावाने हा तमाशा…, ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

Lok Sabha 2024 : निवडणुकांच्या नावाने हा तमाशा…, ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

मुंबई : देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात आणि त्यांचे घरगडी बनलेले निवडणूक आयुक्त ही भाषा खपवून घेतात, असा एकंदर तमाशा लोकशाही आणि निवडणुकांच्या नावाने देशात सध्या सुरू आहे, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे. मतांसाठी देशवासीयांच्या मनात द्वेषाची माती देशाच्या प्रमुखानेच कालवावी काय? पंतप्रधान असा असावा काय? फैसला आता देशवासीयांनीच करायचा आहे, असे आवाहनही ठाकरे गटाने केले आहे.

लोकसभा निवडणुकांचे सातपैकी दोन टप्पे पार पडले आहेत. आणखी पाच टप्प्यांचे मतदान बाकी आहे. मात्र पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा स्तर तर खाली आणलाच; त्यांच्या भाषणातील मुद्द्यांनीही अतिशय खालची पातळी गाठली. पंतप्रधानपदाची एक गरिमा किंवा प्रतिष्ठा असते. अशा सर्वोच्च पदावरील व्यक्तीने आपल्या पदाला शोभेल आणि त्या पदाचा आब राखला जाईल, याच पद्धतीने बोलावे असा एक संकेत किंवा शिष्टाचार असतो, पण ज्यांच्या आचरणातच कमालीचा शिष्टपणा आहे, त्यांच्याकडून ही अपेक्षा तरी कशी करायची? असा खोचक सवाल ठाकरे गटाने केले आहे.

देशाला आजवर लाभलेल्या सर्वच पंतप्रधानांनी आपल्या वाणीतून वा आचरणातून या पदाची प्रतिष्ठा आणि एक राष्ट्रप्रमुख म्हणून संयमाने बोलण्याचा शिष्टाचार कसोशीने जोपासला. पंतप्रधान मोदी मात्र हे सारेच संकेत धाब्यावर बसवून या पदाची प्रतिष्ठा धुळीत मिसळवण्याचे काम करीत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात केली आहे..

‘‘काँगेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. तुमची मंगळसूत्रे खेचली जातील व हिंदूंच्या संपत्तीचे वाटप मुसलमानांमध्ये केले जाईल’’, असे विखारी वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांनी करावे यासारखे दुर्दैव नाही. मासे खाणे, मटण खाणे यांसारखे आहार स्वातंत्र्याचे मुद्दे निवडणूक प्रचारात आणून मांसाहार करणाऱ्यांचा संबंध थेट मोगलांशी जोडणे हे तर वैचारिक दारिद्रय़च म्हणायला हवे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

‘काळा पैसा खणून काढू’, ‘दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ’, ‘स्मार्ट सिटी बनवू’, ‘बहोत हो गई महंगाई की मार…’ वगैरे पोकळ घोषणा देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदाही तोंड उघडताना दिसत नाहीत. जिथे जिथे प्रचाराला जातील, तिथे केवळ हिंदू-मुसलमान, पाकिस्तान आणि पवित्र मंगळसूत्र अशा मुद्दय़ांना हात घालून धार्मिक उन्माद माजवत आहेत. वाटेल तसा तोंडाचा पट्टा चालवून देशात दुही निर्माण करत आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 20204 : लालूप्रसादांची पोस्ट ही समस्त देशवासीयांची भावना, ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल


Edited by Manoj S. Joshi

First Published on: May 4, 2024 4:53 PM
Exit mobile version