Lok Sabha 2024 : जाहीरनाम्यात जुनीच बाटली आणि जुन्याच दारूचा बार उडवला, ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

Lok Sabha 2024 : जाहीरनाम्यात जुनीच बाटली आणि जुन्याच दारूचा बार उडवला, ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

मुंबई : युवा, महिला, शेतकरी, गरीबांना सशक्त करणारा, समान नागरी कायदा लागू करणारा, ‘एक देश, एक निवडणूक’ अशी मोदी गॅरंटी देणारा भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यात नवे असे काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात जुनीच बाटली आणि जुन्याच दारूचा बार उडवला आहे., असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे. (Lok Sabha Elections 2024, Thackeray group’s criticism of BJP’s manifesto)

जनतेला फसवणारा, आधीच्या आश्वासनांना हरताळ फासून पुढच्या पाच वर्षांसाठी फेकमफाक करणारा भाजपाचा जाहीरनामा म्हणजे देशाची आणि जनतेची क्रूर चेष्टाच आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. 300 ड्रोन मिसाईलचा मारा या हल्ल्यात करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला हादेखील भारतीय जनतेवरचा ‘मिसाईल’ आणि ‘ड्रोन’ हल्लाच म्हणावा लागेल, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

लोकांना गुलाम ठेवण्याची मोदी गॅरंटी

महागाईत होरपळलेल्या जनतेला दिलासा नाही. 2014 साली गॅस सिलिंडर 400 रुपये होते. 2019 ला ते 1300 रुपये इतके महाग झाले आणि आता मोदी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की, आम्ही घरापर्यंत पाइपलाइनने गॅस पोहोचविणार आहोत. मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे चालूच ठेवण्याची घोषणा मोदी यांनी केली. किमान 80 कोटी लोकांना माणशी पाच किलो धान्य फुकट देणे म्हणजे 80 कोटी लोकांना पुढची पाच वर्षे गरीब आणि गुलाम ठेवण्याची मोदी गॅरंटीच आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Narendra Modi : काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे युवा मतदारांचे सर्वात मोठे नुकसान; मोदींचा हल्लाबोल

रोजगार देण्याच्या वचनाचे काय झाले?

लोकांना रोजगार हवा आहे. कष्ट करून त्यांना स्वाभिमानाची रोटी कमवायची आहे, पण मोदी त्यांना रोजगार देऊ शकत नाहीत. रोजगाराची गॅरंटी फेल झाल्याने मोदी लोकांना फुकट रेशन देत आहेत. वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे वचन मोदी यांनी 2014 आणि 2019 साली दिले होते. ते कुठच्या हवेत विरून गेले? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी?

समान नागरी कायदा, ‘एक देश, एक निवडणूक’, रामायण उत्सव जगभर साजरा केला जाईल अशा घोषणा भाजपाच्या जाहीरनाम्यात आहेत, पण काश्मिरी पंडितांच्या घरवापसीची गॅरंटी मोदींनी 2014 साली घेतली, ती 2024च्या जाहीरनाम्यात दिसत नाही. मग तुमचा तो समान नागरी कायदा काय कामाचा? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी सांगितलं भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कशी बनेल


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 16, 2024 8:11 AM
Exit mobile version