लोकसभा अध्यक्षच म्हणतात ‘ब्राह्मणच सर्वोच्च’..काय म्हणावं याला?

लोकसभा अध्यक्षच म्हणतात ‘ब्राह्मणच सर्वोच्च’..काय म्हणावं याला?

एकीकडे जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी समाजात सर्वच स्तरातून प्रयत्न होण्याची भाषा केली जात असतानाच दुसरीकडे विद्यमान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारं गंभीर वक्तव्य केलं आहे. ‘समाजात ब्राह्मणांचं स्थान हे कायम सर्वोच्चच राहिलं आहे. ब्राह्मणांनी केलेल्या त्याग आणि तपश्चर्येचा हा परिणाम आहे’, असं ते म्हणाले आहेत. ८ सप्टेंबरला अखिल ब्राह्मण सभेत ओम बिर्ला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून त्यांना ट्वीटरवर देखील ट्रोल केलं जात आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून देखील त्यांनी यासंदर्भातलं ट्वीट केलं आहे.

म्हणे ‘ब्राह्मणच सर्वोच’…

या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेल्या ओम बिर्ला यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण करताना ब्राह्मण समाज कसा सर्वोच्च स्थानावर आहे, याचं जणू बाळकडूच पाजलं. ‘सुरुवातीपासूनच ब्राह्मण समाज इतर समाजांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिला आहे. ग्रामीण भागात ब्राह्मण कुटुंबाचं स्थान अजूनही महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं सहज साध्य झालेलं नसून ब्राह्मण समाजात असणारी त्यागवृत्ती आणि त्यांनी वर्षानुवर्षे केलेली तपश्चर्या त्यासाठी कारणीभूत ठरील आहे’, असं ते म्हणाले. त्यांच्या ट्वीटमध्ये देखील त्यांनी याचा उल्लेख केला आहे.

दरम्यान, भारतासारख्या लोकशाही आणि समाजवादी देशाच्या संसद अध्यक्षांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे गंभीर असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सकडून येऊ लागली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.


हेही वाचा – काय म्हणता? ओला-उबर? निर्मला सीतारमण झाल्या तुफान ट्रोल!

First Published on: September 10, 2019 11:02 PM
Exit mobile version