LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी पुन्हा वाढ

LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी पुन्हा वाढ

देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने अधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे. यानंतर एका महिन्यात आणखी एक धक्का सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. कारण पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याचे समोर आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये नाराजी असताना पुन्हा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना १४.२ किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी ८१९ रूपये मोजावे लागणार आहेत तर, गेल्या फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ३ वेळा दरवाढ करण्यात आली होती.

गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली असून फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडर महाग झाले होते. तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेत असतात. प्रत्येक राज्यात असणाऱ्या वेगवेगळ्या करानुसार, एलपीजीची किंमत बदलत असते. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केल्याने सामान्यांचे महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे.

असे वाढले फेब्रुवारी महिन्यात दर

फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आता मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलेंडरची किंमत पुन्हा २५ रूपयांनी वाढवल्याने एकूण १०० रूपयांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्यांनी दोनदा प्रत्येकी ५०रुपयांची वाढ केली होती. जानेवारीत या किंमतीत कोणतीही दरवाढ झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांचा विचार केला तर एकूण २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला सातत्याने होणाऱ्या या महागाईचा चांगलाच फटका बसल्याचे या दरवाढीतून दिसतेय.

First Published on: March 1, 2021 12:52 PM
Exit mobile version