ऐन दिवाळीत शिमगा; गॅस सिलेंडर महागला

ऐन दिवाळीत शिमगा; गॅस सिलेंडर महागला

प्रातिनिधीक फोटो

ऐन सणासुधीच्या काळात म्हणजे दिवाळीच्या मूहूर्तावर अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेला सर्व सामान्य पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. दिवाळीसाठी सर्व सामान्यांनी बनवलेले बजेट कोलमडले आहे. अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत २.९४ रुपयांची आणि विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी जूनपासून ते आतापर्यंत अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत सहाव्यांदा वाढ केली आहे. आतापर्यंत झालेल्या वाढीनुसार जवळपास १४.१३ रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

अशी झाली गॅस सिलेंडरमध्ये वाढ

मध्यरात्रीपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असून अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत २.९४ रुपयांनी वाढ झाल्यामुळे आता गॅस सिलेंडरची किंमत ५०२.४० रुपयांवर ५०५.३४ रुपयांवर पोहचली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६० रुपयांनी वाढ झाल्यामुळे आता विनाअनुदानित गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी ८८० रुपये मोजावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसच्या किंमती वाढल्यामुळे आणि विदेशी चलनाच्या दरामध्ये होत असलेल्या चढ – उतारामुळे गॅस सिलेंडरच्या किंमतीचे दर वाढ असल्याचे इंडियन ऑइलने सांगितले आहे.

गृहिणींसाठी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरु

अनुदानित ग्राहकांना सरकार वर्षाला १४.२ किलोचे १२ सिलेंडर उपलब्ध करून देते. अनुदानाची ही रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. गृहिणींना धुरापासून सुटका व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना गरिबांसाठी लागू केली. गृहिणींसाठी गॅस सिलेंडरचे कनेक्सन आणि शेगडी दिली. मात्र आता गॅसच्या किंमतीमध्ये वारंवार होणाऱ्या वाढीमुळे गरीबांच्या खिशाला कात्री लागत आहे. आधीच महागाईने मेटाकूटीला आलेल्या जनतेच्या खिशाला आणखी फटका बसत आहे.

First Published on: November 1, 2018 10:39 AM
Exit mobile version