संकटाचे संधीत रुपांतर; करोनामुळे मध्य प्रदेशची बहुमत चाचणी टळली

संकटाचे संधीत रुपांतर; करोनामुळे मध्य प्रदेशची बहुमत चाचणी टळली

मध्य प्रदेशमधील बहुमत चाचणी पुढे ढकलली

मध्य प्रदेशमधील सरकार स्थापन्याचा राजकीय पेचप्रसंग आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. करोनाच्या संकटाला संधीत रुपांतर करत कमलनाथ यांनी बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यश मिळवले आहे. आता बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला २६ मार्चपर्यंतचा अवधी मिळाला आहे. आज सकाळी विधानसभा सुरु झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांचे भाषण झाल्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. बहुमत चाचणी पुढे ढकलल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. पुढच्या ४८ तासात बहुमत चाचणी व्हावी, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.

आज सकाळी राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणाच्या वाचनाला सुरुवात केली. त्यावेळी विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. राज्यपालांनी केवळ एका मिनिटात आपले भाषण संपवले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र लिहून बहुमत चाचणी पुढे ढकलण्यास सांगितले होते. “आमच्या काही आमदारांना बंदीवासात ठेवण्यात आल्यामुळे जोपर्यंत त्यांना सोडले जात नाही, तोपर्यंत चाचणी घेऊ नये.” असे या पत्रात म्हटले होते.

अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेस आणि भाजपचे आमदार मोठ्या जोशात विधीमंडळात हजर झाले होते. भाजपच्या आमदारांच्या गटासोबत मुख्यमंत्री शिवराज सिंह विधीमंडळात आले होते. यावेळी त्यांनी हाताची दोन्ही बोटे उंचावून दाखवत विजय आपलाच होणार, असे दाखवून दिले होते. तर कमलनाथ यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार तोंडाला मास्क लावून विधानभवनात आले होते.

 

First Published on: March 16, 2020 1:13 PM
Exit mobile version