भाजपशी संबंधित कंपनीला काम दिल्याचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळला!

भाजपशी संबंधित कंपनीला काम दिल्याचा आरोप निवडणूक आयोगानं फेटाळला!

सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीटरवर थेट महाराष्ट्र निवडणूक आयोगावर आरोप केला होता. २०१९च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आयोगाच्या सोशल मीडिया अकाऊंटचं काम पाहाण्याचं कंत्राट भाजपशी संबंधित कंपनीला दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, हा आरोप आयोगानं फेटाळून लावला आहे. त्यासंदर्भात राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोगाला अंतरिम अहवाल पाठवला आहे. त्या अहवालात यासंदर्भात भूमिका मांडण्यात आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भाजपशी आयोगाच्या निविदा प्रक्रियेचा कोणताही संबंध कसा नाही, याबाबत मुद्दे देखील मांडण्यात आले आहेत.

हे आरोप झाल्यानंतर काँग्रेसनं देखील हा मुद्दा लावून धरला होता. निवडणुकांदरम्यान महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं फेसबुक पेज हाताळण्याचं काम भाजप जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या मुद्द्यावरून भाजपला जाब विचारला होता. भाजप जनता युवा मोर्चाचे देवांग दवे यांच्याशी संबंधित कंपनीला हे कंत्राट दिल्याचा हा आरोप होता. याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुक आयुक्तांना या प्रकरणावर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अहवालात राज्याचे मुख्य निवडणू अधिकारी आणि देवांग दवे यांच्यात काहीही संबंध नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

First Published on: July 26, 2020 7:14 PM
Exit mobile version