Mahadev Betting App : अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक, मुंबई सीआयडीची कारवाई

Mahadev Betting App : अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक, मुंबई सीआयडीची कारवाई

मुंबई : Mahadev Betting App प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या (सीआयडी) एसआयटीने अभिनेता साहिल खानला जगदलपूर, छत्तीसगड येथून शनिवारी रात्री अटक केली. साहिल खानवर बेटिंग साइट चालवण्याचा तसेच सट्टेबाजीला प्रमोट करण्याचा आरोप आहे, असे सांगण्यात येते. Mahadev Betting App प्रकरणाचा तपास माटुंगा पोलीस करत असताना साहिल खानचे नाव समोर आले होते.

मुंबईच्या माटुंगा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला माटुंगा पोलिसांनी Mahadev Betting Appचे मालक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी या तिघांसह 32हून अधिक जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तर दुसरीकडे, ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय हे देखील या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Mahadev Betting App प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी अभिनेता साहिल खानची चार तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन आणि अटकेतून दिलासा न मिळाल्याने साहिल खान मुंबईतून पळून गेला होता. तब्बल 40 तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी साहिलला पकडले. तोपर्यंत साहिल खान वारंवार आपले लोकेशन बदलत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशानुसार साहिल खान दुपारी 1 वाजता एसआयटीसमोर हजर झाला आणि जबाब नोंदवल्यानतंर तो सायंकाळी 5.30 वाजता परतला. या प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचा दावा साहिल खानने केला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

यापूर्वी मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mahadev Betting App प्रकरणातील दोन मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या रवी उप्पलला गेल्या डिसेंबर महिन्यात दुबईत अटक करण्यात आली होती. या Betting Appचा तो मालक असून ईडीने केलेल्या अपीलानुसार इंटरपोलने याप्रकरणी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्या आधारे दुबई पोलिसांनी ही कारवाई केली होती. रवी उप्पल हा Mahadev Betting App प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरचा सहकारी आहे. Mahadev Betting Appद्वारे ऑनलाइन सट्टेबाजी केली जात होती. भारतात यावर बंदी घालण्यात आली असली तरी, इतर देशांमध्ये ते सुरू होते.


Edited by Manoj S. Joshi

First Published on: April 28, 2024 11:39 AM
Exit mobile version