राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढा; सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्याकडे मागणी

राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढा; सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्याकडे मागणी

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कर्नाटक सीमा वाद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अपमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्ये व शिंदे-फडणवीस सरकारचे मौन यासह विविध मुद्द्यावंर खासदारांनी मंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली. या सर्व मुद्द्यांवर संवेदनशीलपणे व राजकारण बाजूला ठेवून मार्ग काढावा, अशी मागणी मंत्री शहा यांच्याकडे केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

मंत्री शहा यांनी खासदारांचे म्हणणे ऐकून घेतले. खासदारांनी मांडलेल्या मुद्द्यांवर गुजरातमधील शपथविधी झाल्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन मंत्री शहा यांनी दिल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. गुजरात शपथविधीनंतर केंद्रीय मंत्री शहा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्नाटक सीमा वादाबाबत बोलणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या दरबारात कर्नाटक सीमा वादावर गुजरात शपथविधीनंतरच तोडगा निघू शकेल, हे स्पष्ट झाले आहे.

या भेटीत महाविकास आघाडीच्या खासदारांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत असलेली नाराजी मंत्री शहा यांच्याकडे बोलून दाखवली. शिंदे-फडणवीस सरकार हे विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही. कर्नाटक सीमा वादावर महाराष्ट्रातील सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलवणे अपेक्षित होते. शिंदे-फडणवीस सरकारकारने तसे केले नाही. एवढचं काय तर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला झाला. घटनेला २४ तास उलटून गेले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्यावर भाष्य केले नाही, असेही मंत्री शहा यांना सांगितल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्री हे बेताल वक्तव्य करत असतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांची पाठराखण केली जाते. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.  त्यांनी माफी मागितलेली नाही, हेदेखील मंत्री शहा यांना सांगितल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या खासदारांनी मंत्री शहा यांची भेट घेऊन गाऱ्हाणे घातले असले तरी भाजप सरकारमधील मंत्र्यांवर काय कारवाई होणार व दोन्हीकडे भाजपची सत्ता असलेल्या सीमा वादावर काय तोडगा निघणार हे बघावे लागेल.

 

First Published on: December 9, 2022 3:55 PM
Exit mobile version