Lockdown: ‘या’ ट्रॅव्हल कंपनीतील ३५० कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

Lockdown: ‘या’ ट्रॅव्हल कंपनीतील ३५० कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच अर्थकारण कोलमडून पडले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका ट्रॅव्हल बिझनेसवर पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात पर्यटकांच्या ये-जा करण्यावर निर्बंध आले असून यापुढेही काही काळ ते निर्बंध कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जगभरातील ट्रॅव्हल कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या. भारतातील प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी मेकमायट्रीपलाही त्याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. या कंपनीतील तब्बल ३५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

हेही वाचा – राज्यसभेच्या २४ जागांसाठी १९ जूनला मतदान

उत्पन्न नसल्यामुळे घेतला निर्णय 

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणे कठिण होत असल्यामुळे त्यांनी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यामधील सर्वाधीक कर्मचारी हे आंतरराष्ट्रीय विमान सेवा व इतर संबंधीत कामाशी निगडीत होते. मेकमायट्रीपचे संस्थापक दीप कालरा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मागो यांनी त्या कर्मचाऱ्यांना ई मेलद्वारे राजीनामा देण्यास सांगितले. त्यामध्ये त्यांनी नमूद केले की, परिस्थितीत अजूनही नियंत्रणात नाही. तसेच कोविड-१९ चा प्रवाभ आणखी किती काळ जगावर राहिल हेदेखील सांगता येणे कठिण आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: June 2, 2020 9:50 AM
Exit mobile version