‘वर्षभरात ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या अन् मोदी विश्व गुरु व्हायला चाललेत’

‘वर्षभरात ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या अन् मोदी विश्व गुरु व्हायला चाललेत’

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

एका वर्षात ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या पण मोदी विश्व गुरु व्हायला चालले आहेत, अशी घणाघाती टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. काँग्रेसच्या योजनेमुळे देशातील २७ टक्के जनता गरिबीतून वरती आले तर मोदी यांच्यामुळे २३ टक्के जनता पुन्हा गरिबीत गेली आहे. त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचे उत्पन्न घालवणारे सरकार आहे अशी टीका देखील खरगे यांनी केली. खरगे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं.

एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत पण मोदी विश्व गुरु व्हायला चालले आहेत, पहिले तुम्ही देशाचे गुरु तरी बना, अशी खरमरीत टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. भाजप सरकारच्या धोरणांमुळे गरीब जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे. एकीकडे कोविडचं संकट आहे तर दुसरीकडे महागाईचा सामना लोकांना करावा लागतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देशातील लोकांना सुखी ठेवणार आणि याच मुद्यावर त्यांनी मतं घेतली होती. आता ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मोदींनी प्रत्येक भाषणात हेच सांगितलं की काँग्रेसला ७० वर्ष दिली, मला फक्त पाच वर्ष द्या
मात्र, जेव्हा ते सत्तेत आले आहेत, आज काय अवस्था आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता भरडली जात असून डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होत आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्या तेलाच्या किंमती उतरल्यानंतरही देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यात ३८ वेळा हे दर वाढवण्यात आले आहेत, असं खरगे म्हणाले.

पेट्रोलवरती कर लावून २५ लाख कोटी केंद्राने कमावले

केंद्र सरकार इंधनांच्या किंमतीवर सेस लावत आहे. तो कोणत्याही राज्याला मिळत नाही तर तो केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जात आहे. पेट्रोलवरती कर लावून २५ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने कमवले आहेत. मात्र त्यातील महसूल कोणत्याही राज्याला दिला नाही. सिलेंडरवर मिळणारी सबसिडी तीन महिन्यापासून कोणाला मिळलेली नाही, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

First Published on: July 12, 2021 3:04 PM
Exit mobile version