वाढतं वय कमी करण्यासाठी चक्क न्यायालयात याचिका!

वाढतं वय कमी करण्यासाठी चक्क न्यायालयात याचिका!

एमिल रॅटलबँड

आपलं वय लपवणारी अनेक माणसं आपण आपल्या आसपास पाहातो. वाढतं वय लपवण्यासाठी कुणी हेअर कलर करतो, तर कुणी चेहऱ्यावर अनेक सर्जरी करतं, कुणी ढिगभर क्रीम वापरतं, तर कुणी नॅच्युरल थेरेपीने चेहऱ्यावर दिसणारं वय कमी करण्याचा प्रयत्न करतं. पण एका व्यक्तीने वाढतं वय कमी करण्यासाठी चक्क न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असं जर आम्ही तुम्हाला सागितलं तर तुमचा विश्वास बसेल का? अर्थात बसणार नाही. कारण न्यायालयात जाऊन कुणाचं वय कमी होणं शक्यच नाही. पण एका महाशयांनी आपलं वय २० वर्षांनी कमी केलं जावं, अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. डेन्मार्कमध्ये राहणाऱ्या एमिल रॅटलबँड यांनी ही याचिका दाखल केली असून त्यासाठी त्यांनी कारण देखील अजब दिलं आहे!

वय ६९, पण त्यांना जाणवतंय ४९!

एमिल रॅटलबँड यांचं आत्ता वय आहे ६९ वर्ष. पण त्यांचा असा दावा आहे की, त्यांना त्यांचं वय ६९ वाटतच नाही म्हणे! त्यांचं म्हणणं आहे की, ‘वय जरी जास्त असलं, तरी मला माझं वय २० वर्षांनी कमी असल्याचं जाणवतं’! आता आपल्या जाणवण्यावर कुणीही बंधनं तर घालू शकत नाही. पण एमिल महाशयांचं म्हणणं आहे की कोर्टानं त्यांचं वय कागदोपत्री ४९ करावं! आता असं आहे की एमिल रॅटलबँड हे एक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. त्यामुळे त्यांची विल पॉवर प्रचंड आहे. साहजिकच मानसिक दृष्ट्या त्यांना स्ट्राँग वाटत असणार. त्यामुळे वय ६९ असलं, तरी त्यांना जाणवतं ४९ यात काही आश्चर्य वाटायला नको. पण चक्क कोर्टात जाऊन वय कागदोपत्री कमी करण्याची मागणी करणं, हे मात्र आश्चर्य वाटायला लावणारं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – इनकी तो निकल पडी; वर्षाचा पगार दीड कोटी रुपये

अवघे पाऊणशे वयमान!

आता कुणी अशी खुळचट मागणी केली, तर त्याचा परिणाम दुसरा तिसरा काय होणार म्हणा! कोर्टानं त्यांना स्पष्ट शब्दांमध्ये नकार देऊन टाकला. तिथल्या कोर्टानं त्यांना उलट सांगितलं की, ‘तुमचं वय कमी करणं अशक्य आहे. पण जर तुम्हाला पन्नाशीतल्या व्यक्तीसारखंच वागायचं असेल, तर तुम्ही खुशाल वागू शकता. त्याला आमची काहीही हरकत नाही.’ आता यावर कोर्ट तरी काय सांगणार म्हणा! त्यामुळे ‘अवघे पाउणशे वयमान’ ही ओळ या रॅटलबँड महाशयांना अगदी तंतोतंत लागू पडतं, असं म्हणायला हरकत नाही!

First Published on: December 4, 2018 2:48 PM
Exit mobile version