केजरीवाल मंत्रिमंडळातील मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा

केजरीवाल मंत्रिमंडळातील मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री व सध्या अटकेत असलेले मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. सिसोदिया यांच्याकडे १८ खाती होती. विशेष म्हणजे सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडील आरोग्यमंत्री पदही सिसोदिया यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षी ३० मे रोजी अटक करण्यात आली.  हवाला प्रकरणी ईडीने त्यांच्यावर ही कारवाई केली. कोलकाता येथील बेनामी कंपन्यांमधील हवाला गुंतवणूक प्रकरणी त्यांना अटक झाली. ते सध्या तिहार कारागृहात आहेत. त्यांना कारागृहात व्हीआयपी सवलती मिळत असल्याचा आरोपही झाला होता. आरोग्यमंत्री जैन यांच्यावरील आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी फेटाळून लावले होते.

सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी अटक केली. दिल्ली Excise Policy घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी केल्यानंतर सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. त्यांची कोठडी मिळावी म्हणून सीबीआयने सोमवारी सिसोदिया यांना न्यायालयात हजर केले.

न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या कोर्टात सिसोदिया यांना हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील पंकज गुप्ता यांनी सीबीआयकडून युक्तिवाद केला.  Excise Policy मध्ये बदल करण्यासाठी सिसोदिया यांनी सचिवाला नवीन कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगितले होते. नफ्याची टक्केवारी ५ टक्क्यावरून १२ टक्के करण्यात आली. हा बदल का करण्यात आला याचे उत्तर सिसोदिया यांना देता आले नाही. याच्या अधिक चौकशीसाठी सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनवावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील गुप्ता यांनी केली.सीबीआयच्या या मागणीला सिसोदिया यांच्याकडून विरोध करण्यात आला. वरीष्ठ वकील डी. कृष्णा यांनी सिसोदिया यांची बाजू मांडली. Excise Policy च्या नफ्याची टक्केवारी वाढवण्याची मंजुरी राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडून घेण्यात आली होती. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी सिसोदिया यांच्या कोठडीची आवश्यकता नाही, असा दावा वरीष्ठ वकील कृष्णा यांनी केला. उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली

First Published on: February 28, 2023 8:41 PM
Exit mobile version